नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. हे तीनही पर्याय निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) शिल्लक असलेल्या चिन्हांच्या यादीत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यादीत नसलेले चिन्ह आयोग कसं काय देणार, यावर तोडगा काय निघणार, किंवा ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) दिलेल्या पर्यायांपैकी चिन्ह मिळणार का हे लवकरच स्पष्ट होईल.
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणारन नाही. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना निवडणूक चिन्हांचे पर्याय द्यायला सांगितले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने उगवता सूर्य, त्रिशूल आणि मशाल हे पर्याय दिलेले होते. या पर्यायांपैकी एक ही चिन्ह निवडणूक यादीत नसल्याचं आता समोर आलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या पर्यायातूनच ठाकरे आणि शिंदे गटांना चिन्ह निवडावं लागणार आहे. या व्यतिरिक्त जर एखादं चिन्ह पक्षाने सुचवलं आणि ते उपलब्ध असेल तर निवडणूक आयोग त्यावर विचार करु शकतो.
उद्धव ठाकरे गटाकडून तीन पर्याय
शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय दिले आहेत. यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह पोहचवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे.
उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेली बैठक जवळपास दीड तास सुरू होती. या बैठकीत शिवसेना नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करताना त्यांची समजूत काढावी असे आवाहनही ठाकरे यांनी केले असल्याचे समजते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सायंकाळी सहा वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधणार आहेत.