Shivsena critise on BJP : हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेमधील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. अयोध्येत झालेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेने भाजपवर टीकेचे धारदार बाण सोडले आहेत. भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा 'चोरबाजार' असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. त्यांचे ढोंग हे असे उघडे पडले ही श्रीरामाचीच कृपा म्हणायला हवी. ईडी, सीबीआयने एखादे कार्यालय आता कायमस्वरूपी अयोध्येतच उघडायला हवे असेही शिवसेनेने म्हटले आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात भाषण केले होते. या भाषणात त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेने हिंदुत्व सोडले असल्याचे शाह यांनी म्हटले होते.
शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. भाजपसाठी फक्त पैसा व जमिनी हेच सत्य आहे. लोकांना वाटले देवाच्या आळंदीत जायचे आहे, पण भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत. देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी आहे असेही 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले की, भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा 'चोरबाजार' आहे हे वारंवार उघड होत आहे. त्या चोरबाजारात आता अयोध्येचा जमीन व्यवहारही सामील झाला आहे. अयोध्या निकालानंतर राममंदिर परिसरात भाजप पुढारी, भाजपचे आमदार, महापौर, भाजप गटातील नोकरशाही मंडळींनी वैध-अवैध मार्गाने जमिनी खरेदी केल्या. हे व्यवहार संशयास्पद, तितकेच धक्कादायक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वापासून कशी फारकत घेतली वगैरे प्रवचने भाजपचे पुढारी झोडत असतात, पण भाजपचे हे 'व्यापारी' हिंदुत्व त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरो. व्यवहार आणि व्यापारातून या मंडळींनी प्रभू श्रीरामासही सोडले नाही. राममंदिराचा लढा उभारून भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविणाऱया लालकृष्ण आडवाणींना अडगळीत टाकले व आता राममंदिर परिसरात व्यापारी केंद्रे उभी केली असल्याची घणाघाती टीका केली आहे.
मथुरेत मंदिर उभारणीची घोषणा केलीच आहे. त्यामुळे मथुरेतील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमीन-जुमल्यांचे रक्षण करावे हेच बरे, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनीही राज्यातील भाजप नेत्यांनी मंदिरांच्या जमिनी कशा हडप केल्या, त्यातून बेनामी पद्धतीने कोट्यवधीचे व्यवहार कसे केले ते उघड केले आहे. बीड जिह्यातील आष्टी तालुक्यातील तीन मुस्लिम देवस्थाने आणि सात हिंदू देवस्थानांची 513 एकर जमीन भाजपच्या नेत्यांनी हडप केली आहे. कागदपत्रांत फेरफार करून हजारो कोटींचा घोटाळा केला, असा आरोप मलिक यांनी केला आहे. जमिनी लाटण्याचे एक तंत्र आहे व भाजप पुढाऱ्यांच्या 'रोखशाही'ने हे तंत्र विकसित केले असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.