Sanjay Raut : महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे वक्तव्य योग्य असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी व्यक्त केलं. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला 175-180 जागा मिळतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. केंद्रात राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर इंडिया आघाडीच्या आणखी 25-30 जागा वाढल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले. कोणतंही सरकार किंवा संस्था बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो हे लोकांना कळायला हवं. लोकांनी इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मतदान केलं. मोदींना मतदान केलं. त्यामुळं महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीदाचा चेहरा हवा हे आमचं मत असल्याचे राऊत म्हणाले. 


देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही


दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. फडणवीसांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेनं झिडकारुन लावलं आहे. ते स्वत:ला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, पण तसं काही नाही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये यांना स्थान नाही, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लागवाला. 


नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातील ड्रगची महत्वाची केंद्र 


पुणे हे ड्रग्जचं केंद्र बनलं आहे. पुणे हे एकेकाळी सामाजिक चळवळीचं केंद्र होतं. पोलिसांची मदत असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होईल असं वाटत नसल्याचेही संजय राऊत म्हणाले. हे सगळं ड्रग्ज गुजरातमधून येत आहे. नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातील ड्रगची महत्वाची केंद्र आहेत. तरुण ड्रग्जच्या आहारी जातायेत. वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही असेही राऊत म्हणाले.  


मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत


मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे संजय राऊत म्हणाले. आम्ही तिघांनी एकत्र निवडणूक लढवल्यावर महाराष्ट्रात काय निकाल लागला? हे आपण सर्वांनी पाहिलं असेल असंही राऊत म्हणाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत तिन्ही पक्ष राज्यात एकत्र निवडणूक लढणार असल्याचे राऊतांनी सांगितलं. महाविकास आघाडी हाच मख्यमंत्री पदाचा चेहरा हे शरद पवार यांचे वक्तव्य योग्य असल्याचेही संजय राऊत म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा; संजय राऊत यांची अप्रत्यक्ष मागणी