नवा पक्ष स्थापन करुन एनडीएला पाठिंबा दिलेल्या राणेंना राज्य मंत्रिमंडळात सामावून घ्यायचं कसं? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर पडला आहे. कारण राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणेंनी 1 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
नारायण राणे एनडीएत सामील होणार
मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याचं आमंत्रण दिलं असून आपला निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार असल्याचं राणेंनी या भेटीनंतर सांगितलं होतं. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी लगेचच आपण एनडीएत सामील होणार असल्याचं नारायण राणेंनी जाहीर केलं. त्यावरुन शिवसेनेतून कुरबुरी सुरु झाल्या.
राणेंनी एनडीएत सामील होण्याचं जाहीर केल्यानं शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशी चर्चा सुरु होती. पण राणेंच्या घोणषेनंतरही शिवसेनेकडून सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा जाहीर झालेली नाही.
राणे एनडीएत आल्यास त्यांचं स्वागत – दानवे
नारायण राणे यांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांना तासाभरातच एनडीएत सहभागी होण्यासाठी आमंत्रण आल्याची माहिती आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. राणेंनी त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं अजून जाहीर केलेली नाहीत. मात्र ते एनडीएत आले तर त्यांचं स्वागत करु, असं दानवेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं होतं.
राणेंना कोणतं खातं देणार? भाजप मंत्र्यांमध्ये अस्वस्थता
आपल्याकडचं महत्त्वाचं खातं काढून राणेंना देऊ नये, यावरुन भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. त्यामुळे महत्त्वाचं खातं काढून घेऊ नये, यासाठी भाजप मंत्र्यांची धडपड सुरु आहे. राणेंना मंत्रिमंडळात घ्यावं, मात्र इतरांना धक्का लावू नये, अशी भाजप मंत्र्यांची भावना आहे.
दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात राणेंनाही स्थान मिळण्याची शक्यता असल्याने त्याला खोडा घालण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून होत आहेत. राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल, असा निरोप खुद्द उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना स्थान मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, ही घडामोड सुरु असतानाच आज सकाळी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सुमारे अर्धा तास बैठक झाली. त्यामुळे याच पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
संबंधित बातम्या
नारायण राणेंना एनडीएत घेतल्यास शिवसेना बाहेर पडणार- सूत्र
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सामील होणार : राणे
पक्ष स्थापनेच्या तासाभरात राणेंना एनडीएत येण्याचं आमंत्रण : सूत्र
बाळसाहेबांना उद्धव ठाकरेंएवढा त्रास कुणीही दिला नाही : राणे
नारायण राणेंचा नवा पक्ष लवकरच, एनडीएत सहभागी होणार?
नारायण राणे पुढची वाटचाल 1 ऑक्टोबरला जाहीर करणार!
राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?
हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे
राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे
माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही: नितेश राणे
माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे