सोलापूर : तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदासाठी आता शिवसैनिक आग्रही झाले आहेत. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री यांना मंत्रिपद देण्यात यावे यासाठी बार्शीतील शिवसैनिक दंडवत घालणार आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच असलेल्या स्मृतीस्थळ शिवतीर्थपासून ते मातोश्रीपर्यंत महिला आघाडीच्या कार्यकर्त्या दंडवत घालणार आहेत. सोलापुरात पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी ही माहिती दिली.


सोलापूर आणि उस्मानाबाद संपर्क प्रमुख म्हणून तानाजी सावंत हे काम पाहत आहेत. त्यामुळे सोलपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सावंत यांना मंत्रिपद देण्यात यावे या मागणीसाठी बैठक घेतली. सोलापूर शहरासह बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा आदी तालुक्यातील कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या मंत्रीपदासाठी विनंती करत निवेदनावर सह्या केल्या. दरम्यान ही बैठक कोणाचाही निषेध किंवा विरोध करण्यासाठी नसून ही विनंती बैठक असल्याचं मत जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी व्यक्त केलं. तर बैठकीत आक्रमक भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी थांबवत त्यांनी शांतपणे भूमिका मांडत फक्त समर्थनात बोलावे अशी विनंती केली. तानाजी सावंत यांना मंत्रिपद न दिल्याने सोलापूर जिल्हा पोरका झाला असून त्यांचे कार्य विचारात घेऊन मंत्रिपद देण्यात यावे अशी विनंती यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Uddhav thackeray | भाजपच्या षडयंत्रापासून सावध राहा : उद्धव ठाकरे | ABP Majha



ही बंडखोरांची नव्हे, कुटुंबप्रमुखाकडे विनंती करणारी सभा

दरम्यान या बैठकीवरून ही सोलापुरात शिवसेनेत दोन गट पाहायला मिळाले. तानाजी सावंत यांच्या समर्थकांशिवाय दुसऱ्या गटातील शिवसैनिकांनी सोशल मीडियात बंडखोरांची सभा म्हणत टीका केली. मात्र ही बंडखोरांची सभा नसून विनंती करणारी बैठक असल्याचं मत जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी व्यक्त केलं.

उद्धव ठाकरे हे आमचे कुटूंबप्रमुख आहेत. कुटुंबातील एका सदस्याला मंत्रीपद मिळावे या विनंतीसाठी ही बैठक असल्याचे त्यांनी सांगितलं. तानाजी सावंत यांच्यामुळे जिल्ह्यातील हक्काचा माणूस आमचं नेतृत्व म्हणून पुढे आलं. सोलापूर आणि उस्मानाबाद दोन्ही जिल्ह्यात त्यांनी पक्ष वाढवलं. मंत्रिपद असताना जिल्ह्यातील विकासासाठी मोठं अनुदान मिळवून दिलं. अशा कर्तबगार नेत्याला पक्ष वाढवण्यासाठी मंत्रिपद द्यावं अशी विनंती जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी केली. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही विनंती करणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.