मुंबई :  मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा आता 55 वा वर्धापन दिन साजरा होत असून, यंदाही वर्धापन दिनावर कोरोनाचे सावट आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायमच आहे. याचमुळे शिवसेनेने यंदाही पक्षाचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 


मुख्यमंत्री शिवसैनिकांना असे करणार मार्गदर्शन 


कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन नेहमीच्या जोश, जल्लोषाविना होणार आहे. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. उद्या संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी बोलणार आहेत.  शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री बोलणार असल्याची माहिती मिळत असून,कालच उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांचे कौतुक केले होते. उद्या ते आपल्या फेसबुक लाईव्ह सेना भवन समोर झालेल्या राड्याबद्दल देखील भाष्य करणार आहेत. एवढेच नाही तर राम मंदिर मुद्दा यावर देखील मुख्यमंत्री भाष्य करणार आहेत. 


भाजपच्या आरोपांना देणार सडेतोड उत्तर


मुंबई महानगर पालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आलेली असताना भाजपकडून शिवसेनेवर टीका सुरू आहे. या टीकेला देखील उद्धव ठाकरे उत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेली सुमारे 50 वर्षे राजकीय विरोधक राहिलेल्या काँग्रेसशी शिवसेनेनं आघाडी केल्याने शिवसेनेमध्ये सध्या उलटसुलट चर्चा आहे. शिवसेनेच्या विरोधकांकडून काही प्रमाणात भ्रमही निर्माण केले जात आहेत. या सगळ्यांवर उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.