मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अयोध्या दौरा खूप महत्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय, कारण उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे पुढे आले आहेत, त्यामुळेच अयोध्या दोऱ्यात एकनाथ शिंदेचं मोठं शक्तीप्रदर्शन असणार आहे. 


वाजत गाजत, शंख नाद करत ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला निघणार आहेत. मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून दोन ट्रेन पूर्ण कार्यकर्त्यासाठी बुक करण्यात आल्या आहेत. काही कार्यकर्त्यांनी विमानांची तिकिटं बुक केली आहेत. अयोध्या नगरीतले साधूसंत, महंतांनी एकनाथ शिंदेच्या स्वागताची तयारी केली आहे. 


सोप्या भाषेत सांगायचे झालं तर एकनाथ शिंदेचं अयोध्येत जंगी शक्तीप्रदर्शन असणार आहे. एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन विमानानं जाणार आहेत. हे शक्तीप्रदर्शन एकनाथ शिंदेसाठी गरजेचंही आहे कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंशी काडीमोड घेतलाय. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही असा नारा देत 40 आमदारांनी शिंदेच्या नेतृत्वात वेगळी चूल मांडली. हिंदुत्वाचा बाण हाती घेऊन प्रभू रामाच्या दर्शनाला जाणार आहेत.  


कसा असणार आहे अयोध्या दौरा? 


8 एप्रिलला रात्रीच एकनाथ शिंदे लखनऊमध्ये दाखल होतील. त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांची भेट होण्याची शक्यता आहे. 9 एप्रिलला सकाळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जातील. त्यानंतर हनुमान गडी, लक्ष्मण किल्ला करून दुपारी पत्रकार परिषद होईल. त्यानंतर सायंकाळी शरयू तीरावर आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. 9 एप्रिलच्या रात्रीच सर्व मुंबईत परतील आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील. 


प्रभू रामाचा आशीर्वाद घेऊन आपलं हिदुत्वावादी सरकार आहे हे दाखविण्याचा आणखी एक प्रयत्न असेल. याआधी उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे अनेकदा रामभूमीत गेले होते. आता स्वतः मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे तर हिंदूत्वाचे खरे पाईक म्हणून अयोध्येत जाणार आहेत. प्रभू राम लल्लाचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात येतील आणि नव्या दम्यानं कामकाजाला सुरुवात करतील हिंदुत्व आणि विकासाचा मुद्दा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र पिंजून काढतील. 


उद्धव ठाकरेंसह अनेक आमदार, खासदार तीन वेळा अयोध्या दौऱ्यावर जाऊन आले होते. तेव्हा एकनाथ शिंदे आणि ठाकरे एकत्र होते. आता परिस्थिती वेगळी आहे. एकनाथ शिंदे स्वतः शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. त्यात मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदुत्वावादी चेहरा म्हणून सगळ्या देशानं पाहिलं आहे. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत, आपणच कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सगळ्यांनी सांगत आहेत. त्यामुळे भविष्यात शिंदेपाठोपाठ उद्धव ठाकरेही अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.