Shivsena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर राज्यातील भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसाद लाड आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात म्हणजेच तुम्ही हिंदुत्व सोडलं, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. तर उद्धव ठाकरेंच्या भाषणातून विचारांचं सोनं सोडा पण काय भंगार मिळालं हा प्रश्न, असे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलेय. 


मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?


भाषणातून भाजप तसेच शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधणाऱ्या उद्धव ठाकरेंवर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप सेनेचा अडीच अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा फार्मूला ठरला होता असे मी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, असे दसरा मेळाव्यातील जाहीर भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हेच निवडणुकीच्या वेळेस बोलले असते तर बरं झालं असतं. आता कितीही शपथा घेतल्या, बोलले तरी त्याचा उपयोग नाही या शब्दात गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे 


राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलात, दोन मतं कमी पडली म्हणून तुम्ही एम आय एम कडे गेलात. त्याचवेळी तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं, अशी टीका गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता भावनात्मक बोलायला नको तसेच स्फोटकही भाषण करायला नको. आता त्यांचं भाषण करून कुठलाही उपयोग नाही, कारण आता त्यांच्यासोबत कोणीच उरले नाही..लोक तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे महाजन म्हणाले. 


प्रसाद लाड काय म्हणाले?
बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांचे भाषण अतिशय बोगस होतं. या भाषणातून विचाराचा सोनं तर सोडा पण काय भंगार मिळाला हा प्रश्न पडतोय. भंगार लोकांसोबत राहून हे असं झालं. फडणवीस कायदा पाळत नाहीत का? कायद्याची भाषा उद्धव ठाकरे करत आहेत परंतु मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक कोणी केली होती.  प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन प्रसाद लाड यांच्या विरोधात कोणी षडयंत्र रचलं होतं?


उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत आहेत, परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे किती हाल केले हे नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी सांगितले आहे. युतीमध्ये निवडणूक लढवून महाविकास आघाडी सोबत गेला तेव्हाच भाजपच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. 


अमित शहा यांच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी इतिहास पहावा, 70 वर्षात जे झालं नाही ते अमित शहा यांनी करून दाखवलं. 370 कलम हटवलेला आहे पाक व्याप्त कश्मीर देखील ते घेतील. तुम्ही बारा वाजता झोपेतून उठतात, तुम्हाला ते कधी घेतले हे कळणारही नाही.