मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यभरात ठिकठिकाणी मोदी सरकारविरोधात विरोधसत्र सुरु आहे. मुंबईसह नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेनं महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन करत, महागाईरुपी रावणाचं दहन केलं. तर इगतपुरीतील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचा रावण जाळला.


मुंबईतील प्रभादेवी परिसरात मनसेनं महागाईविरोधात तीव्र आंदोलन केलं. यावेळी मनसेनं कमळाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. मात्र, यावेळी मनसे सैनिकांची पोलिसांशी धकाबुक्कीही झाली.

दुसरीकडे नाशकातल्या शालीमारमधल्या शिवसेना कार्यालयापासून महागाईरूपी रावणाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या रावणाला तोंडांवर गॅस, कडधान्य, पेट्रोल-डिझेल अशा वस्तूंची नावं लावण्यात आली होती. रावणाच्या दहनावेळी शिवसैनिकांनी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली.

इगतपुरीतील शेतकऱ्यांनी समृध्दी महामार्गरुपी रावणाचं दहन करत भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अवचितवाडी येथे समृध्दी विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्वृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं.

शेतकऱ्यांनी समृध्दी महामार्ग रद्द करा, 2013 चा भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करा, सिंचनाची जमीन वाचवा, असे फलक हाती घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.

यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि मोपलवारांच्याविरोधात घोषणाबाजी केली.