मुंबई: राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस (Maharashtra Monsoon Session) सुरू असून शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे पहिल्यांदाच विधानसभेत बोलले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या संबंधी निवडणुकींना पाच आठवड्यांची स्थगिती दिली असून राज्य सरकार त्या संबंधी विधेयक पारित करण्यासाठी घाई का करते असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितलं की निवडणुका घेण्यासाठी कोणतीही स्थगिती नसून ती केवळ 92 नगरपालिकांच्या संबंधित सरकारने दाखल केलेल्या याचिकेसंबंधी आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणांसंबंधी 22 तारखेला मिळाल्या असून त्यासाठी निवडणुकींना पाच आठवड्यांची स्थगिती दिली आहे. पण राज्य सरकारला एवढी घाई का आहे? सरकार घटनाबाह्य आहे, पण सगळ्याच गोष्टी घटनाबाह्य करायच्या आहेत का? सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना उद्याच निवडणूक असल्यासारखं यासंबंधी घाई करुन विधेयक पारित का केलं जातंय?
देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या केसमध्ये ज्या ग्रामपंचायची आणि नगरपालिकांना आरक्षणातून वगळण्यात आलं आहे त्यांनाही आरक्षण लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अहवाल दाखल केला आहे. त्यामध्ये ज्या 200 ग्रामपंचायची आणि 94 नगपालिकांच्या निवडणुका आधी जाहीर झाल्या होत्या, त्यांना आरक्षण देण्यात आलं नाही. त्यांच्या अध्यक्षांसाठी ओबीसी आरक्षण लागू केलं आहे, पण त्यांच्या सदस्यांसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आलं नाही.
या संबंधी राज्य सरकारने वेगळी याचिका दाखल केली असून या ग्रामपंचायती आणि नगरपालिकांनाही आरक्षण लागू व्हावं अशी मागणी केली आहे. आता यावर निर्णय करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, त्यासाठी पाच आठवड्यांची स्थगिती देतोय असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. पण केवळ याच संबंधी ही स्थगिती आहे, इतर सर्व निवडणुकांना कोणतीही स्थगिती दिली नाही.
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांना भिडले
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे.