नांदेड : आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे आमदार असलेल्या प्रताप पाटील यांनी नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपला साथ दिली होती. या निवडणुकीत शिवसेनेला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला होता.


शिवसैनिकांनी प्रताप पाटील यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. तिथे प्रताप पाटील यांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यामुळे शिवसैनिक आणि प्रताप पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाजी झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

पोलिसांनी शंभरहून अधिक शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. प्रताप पाटील हे शिवसेनेचे लोहा विधानसभा मतदार संघातून आमदार आहेत. मात्र त्यांनी शिवसेनेविरोधातच दंड थोपटले आहेत. नांदेड महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपला जाहीरपणे मदत केली होती.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रताप पाटील यांचा प्रचारसभेत समाचार घेतला होता. प्रताप पाटील शिवसेनेचे आमदार असून त्यांनी भाजपला मदत केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.