श्रीवर्धन, रायगड :  शिर्डी येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न केला. पण, त्यांनी 70 हजार कोटींचा उल्लेख केला नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले. काल मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होतं असे म्हणत पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पवारांनी 70 हजार कोटींची कर्जमाफी केली असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले. 


रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा आज पडत आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार अनंत गीते आदी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'इंडिया' आघाडीचे नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत.


शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी कार्यक्रम स्थळी आलो त्यावेळी वाटलं की मी आताच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलो आहे की काय? कारण समोर खुर्च्या मोकळ्या होत्या. यांच्यात आता खुर्चीसाठी मारामार आहे परंतु बाहेर सभेला मात्र खुर्च्या खाली असतात. व्यासपीठावर आज राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे, शेकापचे पदाधिकारी आहेत एकेकाळी आमच्या मारामाऱ्या व्हायच्या. आता नवीन समीकरण झालं आहे. आता केवळ मी आणि मीच सुरू आहे त्या विरोधात आपण एकत्र आलो आहेत. आमच्या एखाद्याला व्यक्तीला नाही तर वृत्तीला आहे.


काल  पंतप्रधान मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होतं. ते म्हणाले की शरद पवार यांनी शेतीसाठी काही केलं नाही. परंतु 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शरद पवारांनीच केली होती, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. किती सुडाचं राजकारण कराल परंतु एक दिवस महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा आसूड निघाला की या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना जागेवर आणता येईल.


जे गुन्हेगार आहेत गद्दार आहेत त्यांना टकमक टोकावर जायची वेळ आली आहे. इथल्या गद्दारांना टकमक टोक दाखवायची वेळ आली आहे. ईडीची वेळ आली की हे पलिकडे गेले असे मिंदे राजकरण कधी झालं नव्हतं. आम्ही हुकूमशाहीला गाडण्यासाठी एकत्र आलो असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :