मुंबई : दसऱ्यानिमित्ताने आज होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे (Shiv Sena Dasara Melava) लागले आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde) दसरा मेळावे होणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय, ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या दसरा मेळाव्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dasara Melava Speech) यांनी बंडखोरांवर आणि भाजपवर टीकेचे बाण सोडले होते. यंदाच्या भाषणात उद्धव यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील निशाण्यावर असणार आहेत. तर, अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाने बऱ्यापैकी कात टाकण्यास सुरुवात केली आहे. अनेक नवीन चेहऱ्यांना पक्षात संधी दिली जात आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून अजूनही ठाकरे गटाचे शिलेदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गटाने या मेळाव्याचे तीन टीझर प्रदर्शित केले आहेत. यामध्ये शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
>> उद्धव यांच्या भाषणात कोणत्या मुद्यांचा समावेश?
> काही महिन्यातच होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे सरकार असणार आहे. उद्धव यांनी शिवसैनिकांना होऊ दे चर्चा हा कार्यक्रम दिला होता. यातून केंद्र सरकारच्या कारभाराचे आणि निवडणूक आश्वासनांचे वाभाडे काढण्यात आले. आता, उद्धव पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर कोणता हल्लाबोल करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. त्याशिवाय, उद्धव ठाकरे हे विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीबद्दलही उपस्थित शिवसैनिकांना आपली भूमिका अधिक स्पष्ट करून सांगण्याची शक्यता आहे.
> जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजप पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे गटावर हिंदुत्वाच्या मुद्यावर टीका केली जात आहे. राम मंदिर उद्घाटन आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव हे आपल्या भाषणात भाजपवर, शिंदे गटावर प्रहार करण्याची शक्यता आहे.
> राज्यात कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळाची स्थिती आहे. अशा स्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. पिक विम्याची रक्कम मिळत नसल्याचे आरोप होत आहे. पिक विमा योजनेतील घोटाळा, राज्य सरकारचे असलेले दुर्लक्ष आदी मुद्यांवर उद्धव भाष्य करतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
> राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उद्धव भाष्य करू शकतात. उद्धव यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता आले नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतो. त्यालाही उत्तर देत मराठा समाजाला वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून करू शकतात.
> शासकीय कार्यकारी पदांसाठी कंत्राटी नोकर भरतीचा आदेश सरकार काढला. विद्यार्थी-युवकांच्या विरोधानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर मागे घेणार असल्याची घोषणा केली. त्यावेळी फडणवीस यांनी याचे खापर मविआ सरकारवर फोडले. त्यालाही उद्धव उत्तर देण्याची शक्यता आहे.
> त्याशिवाय परदेश दौरे, भ्रष्टाचार, ड्रग्ज रॅकेट, राज्यातील कायदा-सुव्यवस्था या विषयांवर शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर उद्धव तोफ डागण्याची शक्यता आहे.