Shiv Sena symbol and name dispute: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय 20 ऑगस्ट रोजी अंतिम फैसला देणार होतं. मात्र, पुन्हा एकदा तारीख ते तारीख प्राप्त झाली आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. हे घटनापीठ राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यांवर 19 ऑगस्टपासून सुनावणी सुरू करणार आहे. या घटनापीठाचे न्यायमूर्ती सूर्यकांत सुद्धा भाग असणार आहेत. त्यामुळे शिवसेना वादाचा फैसला आणखी काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.
सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य असल्याने शिवसेना सुनावणी लांबणीवर
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. त्यामुळे सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य असल्याने शिवसेना सुनावणी लांबणीवर पडली आहे. घटनापीठाची सुनावणी 19 ऑगस्टपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याने शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी असून त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना चिन्ह आणि नावाच्या वादावर 15 सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. कदाचित 15 सप्टेंबरनंतर अंतिम तारीख निश्चित होऊन किंवा ऑक्टोबरमध्येच हे प्रकरण खंडपीठासमोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष कोणाची याची उत्सुकता अवघ्या काही दिवसांवर आली असताना पुन्हा एकदा तारीख पे तारीख भेटली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच निकाल येणार?
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून या प्रकरणाची तातडीने सुनावणी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये विनंती करण्यात आली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत, त्यामुळे आम्ही एकदाच काय ते या प्रकरणावर निकाल देऊ असं म्हणत हे प्रकरण लवकरात लवकर संपवणार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर 20 ऑगस्ट तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली होती. आता तारीख पे तारीख झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना पक्ष चिन्हाचा अंतिम फैसला समोर येण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या