Shiv Sena Pune News :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या 9 जागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदार नीलम गोऱ्हे यांचा देखील कार्यकाळ संपत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुन्हा शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे. अशातच शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. यामध्येउपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी न देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, उलट महिलांचे खच्चीकरण केलं

पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हे यांनी काही केले नसून उलट महिलांचे खच्चीकरण होईल यावर  त्यांनी भर दिल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. महिलांचे चरित्र हनन करुन त्यांच्यात भांडणे लावून संघटनेचे मोठे नुकसान केले आहे. नीलम गोऱ्हे या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आमदार करणार असल्याचा शब्द दिला असल्याचे सांगत आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या ऐवजी सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली तर कार्यकर्ता तुम्हाला सलाम करेल असे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अन्यथा उध्दव ठाकरे यांच्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा एकदा बाईने फसवले असे पत्रात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात तारीख व कुणाचे नाव नसून पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी या नावाने पत्र देण्यात आलं आहे.

विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार 1. उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)

2. नीलम गोऱ्हे (शिवसेना)

Continues below advertisement

3. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)

4. अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)

5. गोपीचंद पडळकर (भाजप)

6. रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)

7. राजेश राठोड (काँग्रेस)

8. प्रवीण दटके (भाजप)

9. रमेश कराड (भाजप)

28 मतांचा कोटा आवश्यक

दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026

उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026

मतदानाची तारीख: 12 मे 2026

मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.

मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026