Shiv Sena MLA Disqualification Case :  एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला. मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षावर राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. राहुल नार्वेकरांच्या निकालावर विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. आजचा निकाल म्हणजे खोदा पहाड आणि निकला चुहा असा आहे. सगळेच पत्र आहेत मग लढाई कशासाठी. संविधानाची हत्या केली आहे. जर अपात्र करायचं नव्हतं तर मग केस केली कशाला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. 


महाराष्ट्राच्या जनतेला हे सरकार मान्य नाही. आजचा विजय हा उद्धव ठाकरे यांचा आहे. उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र केले असते तर नाचक्की झाली असती म्हणून तर यांनी पात्र केलं का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.  माझी या सरकार कडून काहीचं अपेक्षा नाही. 40 वाला मुख्यमंत्री आहे आणि 105 आमदार असलेला मागचा बँचवर आहे, असाही टोला लगावला. 


तर जनतेचा क्रोध ओढवला असता -


हा निकाल महाशक्तीच्या आदेशानं झाला आहे. एकेकाळच्या मित्रपक्षाला संपवण्यात भाजपला यश आलं असं त्यांना वाटत असेल. आजचा निकाल स्क्रीप्टेड- लिहून दिलेला आहे. हा अंतिम निकाल नाही. दोन्ही लोकांना पात्र ठरवलं कारण एक पात्र आणि दुसरा अपात्र असं झालं असतं तर जनतेचा क्रोध ओढवला असता. सहानुभूती मिळाली असती, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 


ठाकरेंना अपात्र न ठरवण्यामागे त्यांना सहानुभूती मिळूनये हा उद्देश आहे. लोकशाही संपवणारे पाऊल आहे. संविधान, घटना शिल्लक राहील की नाही ही शंका आहे. हा निकाल अंतीम नाही. ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. आमच्यासाठी शिवसेना ठाकरेंचीच आहे. जेव्हा शिंदे गट व्हीप काढेल तेव्हा बघूयात. या निकालाचा जागावाटपावर कोणताही परिणाम होणार नाही. आजच्या निकालाचं वाचन हे इंग्रजीतून झालं हे चूकीचं आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 


मशाल मोकळी झाली, शरद पवार थेटच बोलले - 


आजच्या निकालात काहीही आश्चर्य नाही. आम्ही आपसात जी चर्चा करायचो की हा निकाल उद्धव ठाकरेंना अनुकूल नसेल. मुख्यमंत्र्यांना हा निकाल त्यांच्या बाजूने लागेल हा आत्मविश्वास आहे. उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल आणि तिथे उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल असं आजच्या निकालावरुन वाटतंय. विधिमंडळापेक्षा पक्ष संघटना महत्वाची असते हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. मात्र विधिमंडळाचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो. विधिमंडळाला नाही. राहूल नार्वेकरांनी दोन्ही बाजूंना पात्र ठरवलय. नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाची गाईड लाईन बदललीय. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना संधी आहे.  उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिलेत.  या निकालाचा आमच्यावर परिणाम होणार नाही. नार्वेकर यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पायमल्ली आहे, हे सांगण्याची संधी महाविकास आघाडीला प्राप्त झालीय. आम्ही तो कार्यक्रम लवकरच सुरु करू.  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना हे लोकांना  माहीत आहे. निकाल दोन दिवसांवर आला असताना नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असतील तर निकाल स्पष्ट होता.  त्यामुळे इतरांच्या बाबतीत देखील असाच निकाल येईल अशी शक्यताय. भरत गोगावले यांना व्हीपचा दिलेला अधिकार हा वादाचा विषय ठरू शकेल.मशाल मोकळी झाली, असे शरद पवार म्हणाले.