मुंबईशिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case)  प्रकरणात आज पुन्हा विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल.  आजपासून सलग पाच दिवस सुनावणी होणार आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu)  यांची साक्ष अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आज त्यांच्या साक्षीने कामकाजाला सुनावणी सुरु होईल. 28, 29 आणि 30 नोव्हेंबरला सलग तीन दिवस आमदार सुनील प्रभू यांची उलट साक्ष होणार आहे. अॅड. महेश जेठमलानी आणखी तीन दिवस  सुनील प्रभूंची उलट साक्ष घेणार आहे. सुनील प्रभूंसोबतच शिवसेना कार्यालय कर्मचांऱ्याची उलट साक्ष होणार  आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची शिंदे गटाचे वकिल अॅड. महेश जेठमलानी यांच्याकडून उलट तपासणी सुरू आहे. मागील वेळी  आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली होती. फक्त 16 दिवस माझ्याकडे या सुनावणी साठी आहे त्यात हे प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. नार्वेकर यांनी म्हटले की, मला 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त 16 दिवसाचा कालावधी आहे असल्याचे त्यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आज सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले. 


आमदार अपात्रता सुनावणीचे असे आहे वेळापत्रक?


शिवसेना आमदार आपत्रता प्रकरण सुनावणी 18 दिवसांमध्ये चालणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या. 


 पुढील सुनावणी तारखा -


> 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 


> 1, 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर 


> 11 ते 15 डिसेंबर सलग सुनावणी


> 18 ते 22  डिसेंबर सलग सुनावणी


 शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu MLA) यांची एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी उलट तपासणी घेतली. आजही ही उलट तपासणी सुरु आहे.  पहिल्या दिवशी इंग्रजी भाषेतील मुद्द्यावरुन जेठमलानी यांनी सुनील प्रभूंवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्या प्रश्नांना सुनील प्रभू यांनीही चाणाक्षपणे उत्तरं दिली. मग काल दुसऱ्या दिवशी व्हिपवरुन खडाजंगी झाली. महेश जेठमलानींच्या यॉर्कर्सना सुनील प्रभूंनी सिक्सर मारल्याची भावना ठाकरे गटाने व्यक्त केली. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही विधानसभेत घमासान पाहायला मिळाले .