MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी  शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला आहे. आता, शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे. आता, अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. 


आज, दोन्ही गटांकडून  उलट तपासणी साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज, 12 डिसेंबर रोजीच उलट तपासणी संपवण्याचे निर्देश दिले होते.  आज,  12 डिसेंबर रोजी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष नोंदवण्यात आली. आता, 13 डिसेंबरपासून ते तीन दिवस अर्थात 15 डिसेंबरपर्यंत  लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर अंतिम सुनावणी सोमवारी 18 डिसेंबरपासून सुरू होणार. अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत पूर्ण होणार आहे. उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे. 
शनिवारी आणि रविवारी होणरी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे. 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे.  सातत्याने सकाळ आणि संध्याकाळी जवळपास दररोज सात तास सुनावणी घेऊन साक्ष पूर्ण झालेली आहे. आता पुढील कार्यवाही पूर्ण करून हे प्रकरण निकालासाठी बंद करण्याचे मी प्रस्तावित केले आहे. त्या अनुषंगाने सर्वांच्या सहकार्याने 20 तारखेपर्यंत हे कार्य पूर्ण करायचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. 


व्हीपचा मुद्दा कळीचा ठरणार?


शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनीस प्रभू यांची उलट तपासणी शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी घेतली. त्यावेळी अॅड. जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना व्हीपच्या मुद्यावर घेरले. प्रभू यांनी व्हीप जारीच केला नाही हे ठरवण्याच्या अनुषंगाने प्रश्न केले. जेठमलानी यांच्या प्रश्नांवर प्रभू यांनीदेखील जोरदार पलटवार केला. अॅड. जेठमलानी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विधीमंडळ कार्यालयीन सचिव  विजय जोशी यांचीदेखील साक्ष नोंदवली. तर, ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी केली. अॅड. कामत यांच्या उलट तपासणीत शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीप मिळाला नसल्याचे म्हटले होते.