पुणे :  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या ईडीकडून होत असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीका केली आहे. केवळ ईडीकडे आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही त्यांचे पत्ते आहेत. ते आम्ही चौकशीसाठी देऊ, असं संजय राऊत म्हणाले. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा आढावा बैठकीसाठी राऊत आलेत. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इथं पण अनेक घोटाळे आहेत. पण इथं ईडी किंवा सीबीआय का जात नाही. की फक्त यांच्याकडे खडसे, देशमुख, सरनाईक यांचेच पत्ते आहेत. भाजपवाल्यांचे पत्ते नाहीत का? आम्ही पण ह्यांचे पत्ते देऊ, असं ते म्हणाले.  यंत्रणा वापरून दहशत वापरणाऱ्यांचं नामोनिशाण संपल्याच अनेकदा पाहिलेलं आहे. तसंच होईल, असंही ते म्हणाले.


संजय राऊत म्हणाले की, सहकार खातं केंद्रात काढून काही कार्यक्रम करायचा विचार असेल तर आम्हीही कार्यक्रम करू. खरं तर सहकार हा राज्याचा विषय पण तो केंद्राशी जोडला आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी केवळ केंद्रात सहकार खातं  निर्माण केलंय का? तर मग हा परत एक सत्येचा गैरवापर आहे. राज्यातील सहकाराला अडचणीत आणण्याचा, त्रास देण्याचा या खात्याद्वारे कार्यक्रम केला असेल तर आम्हाला पण ह्यांचा कार्यक्रम करता येईल. मुळात सहकार हा राज्याचा विषय आहे. राज्याच्या ताब्यातील सहकाराला खतम करण्याचा प्रयत्न असेल तर लोकशाहीच्या दृष्टीने हा धोका आहे, असं राऊत म्हणाले.


पिंपरी चिंचवडला महापौर का नाही? याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये महापौर बसवायचाच. त्याअनुषंगाने शिवसैनिक कामाला लागलेत. भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवड या मुद्द्यावर आगामी महापालिका निवडणूक लढणार असल्याचं ते म्हणाले. 


संजय राऊत म्हणाले की, भाजपची आता ताकद जास्त आहे म्हणजे ती सूज आहे. उद्या काय होईल, भाजपचे अनेक राष्ट्रवादीत किंवा दुसऱ्या पक्षात जातील, हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे. इथले सगळे भाजपवाले ठेकेदारीत गुंतलेले आहेत. हा आमचा धंदा नाही, म्हणून अबाधितपणे मुंबईत आहोत, असं ते म्हणाले. इथं महाविकास आघाडीबाबत निर्णय योग्यवेळी घेऊ असंही ते म्हणाले. 


संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे, अशी राजकीय चर्चा आहे. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा मोठा आहे. त्यांचं योगदान विसरता येणार नाही.  मी कधी वाईट बोलत नाही, माझं एक असं स्टेटमेंट दाखवा की मी वाईट बोललोय. मला त्यांनी दाखवावं, यापुढे मी कोणाशी बोलणार नाही, असं राऊत म्हणाले. 


राणें मंत्रीपदावर बोलताना ते म्हणाले की, राणे मुख्यमंत्री राहिलेत, अनेक पद भूषवली, त्यांची राजकीय गरुड झेप पाहिली आहे. हे पाहता त्यांना मिळालेलं खातं कमकुवत आहे. मोठं खातं मिळालं असतं तर महाराष्ट्र म्हणून गौरव वाटला असता. ते चांगलं कार्य करतील असा विश्वास आहे. तसं कार्य केलं तर मोठ्या मनाने कौतूक करू, असंही राऊत म्हणाले.