Shiv Sena Foundation Day Eknath Shinde: खोके कुठं गेले हे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांची पुण्याई आहे. पण तुम्ही आपल्या मर्यादेत राहा अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. एक नोटीस आली तर मोदी शाह यांच्याकडे धावत गेले असल्याचा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून कार्यक्रम घेण्यात आला. शिंदे गटाकडून गोरेगाव येथील नेस्को संकुलातील कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जवळपास तासभराच्या भाषणात ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला. मागील वर्षी 20 तारखेला क्रांतीची सुरुवात झाली. आपण सगळ्यांनी उठाव केला. अनेक देशांनी आपल्या उठावाची दखल घेतली. शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन केले. लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. खुर्चीसाठी बाळासाहेबांचं विचार तुम्ही सोडले. तुम्ही गद्दारी केली. आम्ही गद्दारी केली नाही. शिवसेनेचा धनुष्य बाण तुम्ही गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवून आणला असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर टीका केली. अडीच वर्षाच्या काळात मागील मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या सह्या केल्या नसतील तेवढ्या सह्या मी मागील 11 महिन्यात केल्या आहेत. मागच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हता. माझ्याकडे दोन पेन आहेत. मी गाडीतून फाईल घेऊन जातो, त्यात सह्या करतो. रस्त्यावर, वेळ मिळेल तशा सह्या करतो आणि फाईल मार्गी लावतो असेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच वर्षात दोन कोटींची मदत नागरिकांना देण्यात आली होती. मात्र, या 11 महिन्यात लोकांसाठी 75 कोटी वाटले. लोकांसाठी सरकार असून त्यांच्या कामी निधी आला पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
कामातून उत्तर देणार
शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्याने खोके सरकार, गद्दार अशी टीका केली जाते. या टीकेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आमच्यावर कितीही टीका केली तरी आम्ही कामातून उत्तर देणार आहोत. तीच कॅसेट सारखी वाजवू नका. तेच तेच सारखे बोलताय... किमान स्क्रिप्ट रायटर्स बदला असा टोलाही त्यांनी लगावला.
वाघाची डरकाळी फोडेपर्यंतच तुमची कोल्हेकुई सुरू राहणार
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रविवारी केलेल्या टीकेचाही मुख्यमंत्री शिंदे यांनी समाचार घेतला. वाघाची डरकाळी फोडेपर्यंतच तुमची कोल्हेकुई सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. वाघ जंगलात आल्यानंतर अनेकजण पळून गेले. उठाव करायला वाघाचं काळीज लागतं आणि आम्ही उठाव केला असल्याचे त्यांनी म्हटले.