शिर्डी : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळ खुली होणार असून आज साईबाबा (Saibaba) संस्थानने साईभक्तांसाठी नियमावली जाहीर केली आहे. मंदिर उघडण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले असून केवळ 24 तास शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थानच्यावतीने साई दर्शनासाठी दिवसाला पंधरा हजार दर्शन पासची व्यवस्था भाविकांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती श्री साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे


कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रे सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शिर्डी शहरातील आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबांच्या मंदिराच्या इतिहासात प्रथमच साई मंदिर बंद करण्यात आले होते. गेल्या 19 ते 20 महिन्यांच्या कालावधीत साई मंदिर दोन वेळा बंद झाले. यामध्ये शहरातील अनेक छोट्या मोठ्या लोकांना आर्थिक फटका बसला आहे. मात्र आता मंदिर सुरू होणार असून साईबाबा संस्थान सज्ज झाले आहे.  आज दर्शनाची नियमावली जाहीर केली आहे. साईबाबा मंदिरात दिवसाला 15 हजार पासेसची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली असून त्यामध्ये पाच हजार फ्री ऑनलाईन पद्धतीने, पाच हजार ऑफलाइन पद्धतीने (बायोमेट्रिक) तर पाच हजार पासेस सशुल्क पद्धतीने  देऊन दर्शन दिले जाणार आहे.  साईबाबांच्या सर्व आरतीचे पास ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत व यात प्रत्येक आरतीला फक्त 10 ग्रामस्थांसाह 90 भाविकांना उपस्थित राहता येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 


शिर्डी साईमंदिर दर्शन नियमावली



  • दररोज 15 हजार भाविकांना दर्शन दिले जाणार 

  • पाच हजार ऑनलाईन, पाच हजार सशुल्क पासद्वारे तर पाच हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मिळणार मोफत दर्शन पास

  • दर तासाला 1150  भाविकांना दिले जाणार दर्शन

  • साईबाबांची काकड आरती, माध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश

  • प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश

  • 65 वर्षावरील नागरिकांना आणी 10 वर्षाच्या आतील बालकांना व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश नाही

  • साईभक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार

  • साई मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास मनाई

  • साई मंदिराचे भक्तनिवासही सुरू होणार

  • online.sai.org.in या वेब साईट वर दर्शन व आरती पास मिळतील


शासनाच्या नियमावलीनुसार 65 वर्षापेक्षा जास्त तसेच 10 वर्षाखालील बालकांसोबतच गर्भवती महिलांना साई दर्शन घेता येणार नसल्याच स्पष्ट केलं आहे. साई मंदीर व दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये अंतर ठेवण्यासाठी सहा फुटावर मार्किंग करण्यात आले आहे. तसेच थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था प्रवेशद्वारावर केली आहे. याशिवाय मंदिरात मूर्तीच्या गाभार्‍यात हात न लावता दर्शन दिले जाणार असून भाविकांसाठी चक्रीय पद्धतीने भक्तनिवास सुद्धा उपलब्ध करून देणार असल्यची माहिती भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.