जळगाव : अर्थसंकल्पामध्ये (Budget) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ( loan waiver) तरतूद न केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेतर्फे महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावात ही अनोखी होळी करत, सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आला आहे.
सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांचा संताप
अर्थसंकल्पात महायुतीच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफीचा उल्लेख न केल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीवर निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र, कोणतीही तरतूद याविषयी करण्यात न आल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आज महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीची आग्रही मागणी करत आहेत. परंतु राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. मागील दोन तीन वर्षापासून आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न घटलं आहे. परिणामी शेती आतबट्टयाचा धंदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत.