मुंबई : येत्या महिनाभरात मराहाराष्ट्राचा दौरा करणार असून त्या माध्यमातून पक्षाच्या संघटनेत नवीन तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी दिवसरात्र काम करणार अशी ग्वाही शरद पवार यांच्या पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. आर आर पाटील यांच्या प्रमाणे काम करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ ही विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया देताना दिवंगत नेते आर आर पाटील यांची आठवण काढली.

Shashikant Shinde NCP :  आर आर पाटलांप्रमाणे संधीचं सोनं करणार

शशिकांत शिंदे म्हणाले की, पक्षामध्ये अनेक दिग्गज नेते पात्र असतानाही मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करणार. सर्वसामान्य नेत्याला संधी मिळाल्यावर कसं काम करता येतं हे आर आर पाटलांनी दाखवून दिलं. मी देखील आर आर पाटलांप्रमाणे काम करणार. शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवणार, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरणार. राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करणार.

NCP Maharashtra President : नवीन तरुणांना संधी देणार

आताचं राजकारण बदललं असून सत्तेचं आणि पैशाचं आमिष दाखवलं जातं. त्याच्या विरोधात लढा देणार. महिन्याभरात राज्याचा दौरा करणार असून त्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करणार. राजकारणामध्ये नवीन तरुणांना संधी देणार, वेगवेगळ्या घटकांना सोबत घेणार असं शशिकांत शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. 

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांनी जवळपास आठ वर्षे काम केलं. त्यानंतर आता ही जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. लोकसभेमध्ये पक्षाला मोठं यश मिळालं. पण विधानसभेत मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं. शरद पवार यांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा नवीन संजिवनी देण्याचं आव्हान शशिकांत शिंदे यांच्यासमोर असणार आहे. 

ही बातमी वाचा: