मुंबई: राष्ट्रवादीच्या (NCP Crisis) प्रकरणात निवडणूक चिन्ह गोठवले जाणार नाही, निवडणूक आयोग (Election Commission) तात्पुरता निर्णय न देता अंतिमच निर्णय देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेप्रमाणे (Shiv Sena) या ठिकाणी आधी तात्पुरता आणि मग अंतिम निर्णय असं होणार नाही. त्यामुळे एका गटाला घड्याळ चिन्ह आणि नाव मिळणार तर दुसऱ्या गटाला पक्षासाठी नवीन चिन्ह आणि नवीन नाव शोधावं लागणार आहे. 


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित होते. निवडणूक आयोगात अजित पवार गटाने सर्वप्रथम याचिका दाखल केल्याने त्यांना युक्तिवादाची पहिल्यांदा संधी देण्यात आली. आजची सुनावणी संपली असून यावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्या दिवशीही अजित पवार गटाला युक्तिवाद करता येणार आहे. त्यानंतर वेळ असल्यास शरद पवार गटाला संधी दिली जाईल असं सांगितलं जातं. 






चिन्ह एका गटाला मिळणार


शिवसेनेच्या बाबतीत जे झालं ते राष्ट्रवादीच्या बाबतीत होणार नसून राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवलं जाणार नाही. कोणत्यातरी एका गटाला घड्याळ हे चिन्हे देण्यात येणार असून दुसऱ्या गटाला वेगळं चिन्ह शोधावं लागणार आहे. 


शिवसेनेसारखी परिस्थिती नाही


शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निर्णय घेताना पहिला चिन्ह गोठवलं. त्यावेळी अंधेरी विधानसभा निवडणूक तोंडावर होती, त्यामुळे निवडणूक आयोगाने तो निर्णय घेतला होता. त्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना वेगवेगळं चिन्ह देण्या आलं होतं. दोन महिन्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं आणि ठाकरे गटाला वेगळं चिन्ह देण्यात आलं. 


राष्ट्रवादीमध्ये तशी परिस्थिती नाही. सध्या राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत, तसेच देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोग अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


या बातम्या वाचा: