काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे, असे पवार यांनी म्हटलं आहे. सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन पवारांनी केलं आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मात्र आम्ही मुंबईला येणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या जात आहेत. शरद पवार हे सर्व कार्यकर्त्यांचे विठ्ठल आहेत. त्यांच्यासोबत आपण स्वत: जाणार असून सर्व कार्यकर्त्यांनीही हजर राहण्याचं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. शरद पवारांच्या ट्वीटला उत्तर देताना आव्हाड यांनी माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार. तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय. वय वर्ष 79. हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय. उद्या साठी माफ करा. ह्या सगळ्या आपण एकटाच लढलात. सगळ्या संकटांवर मात केलीत . ह्या लढाईत मात्र तुम्हाला साथ द्यायला महाराष्ट्र तयार आहे. म्हणून साहेब 35 वर्ष तुम्ही जे सांगितलं ते ऐकलं. पण ह्यावेळेस माफ करा, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीनं शरद पवार, अजित पवारांसह 70 सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल केलाय. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्या ईडी कार्यालयात जाऊन, अधिकाऱ्यांना सगळी माहिती देणार आहेत.