अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार आसूड ओढले आहेत. नोटाबंदीमुळे काळा पैसा असणारे सुखात झोपत आहेत तर गरीब बँकेत उभे आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.


शरद पवार म्हणाले की, "काळा पैसा बाहेर काढणं चूक नाही. मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी परदेशात असलेला काळा पैसा जनतेच्या खात्यात टाकणार, असं मोदींनी म्हटलं होतं. त्याला जनता भूलली. मोदींनी परदेशात चकरा मारल्या, स्वित्झर्लंडला गेले, पण तिथून मोकळ्या हाती परतले."

"काळा पैसा बाहेर काढण्याला आमचा पाठिंबा आहे. पण काळा पैसा असणारे सुखाने झोपत आहेत, मात्र गरीब बँकेच्या रांगेत उभे आहेत. ते आजही बँकांबाहेर रांगा आहेत. घरातील एक माणूस बँकेत उभा असतो," अशी टीकाही पवारांनी मोदींवर केली.

"साडे 15 लाख 42 हजार कोटी जुन्या नोटांपैकी 14 लाख कोटी नोटा बँकेत पुन्हा परतल्या आहेत. खरंतर नोटाबंदीनंतर सरकारला 3 लाख कोटींचा काळा पैसा सापडेल, अशी अपेक्षा होती. मग काळा पैसा कुठे आहे? तो अजून सरकारच्या हाती लागला नाही," असा सवालही पवारांनी विचारला आहे.

जिल्हा बँकांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "सोसायटी, पतसंस्था हे वैभव आहे. तातडीने गरजूंना पैसे मिळतात, जिल्हा बँकेवर ग्रामीण व्यवस्था अवलंबून आहे."