पुणे : मतदाराच्या आग्रहास्तव मी कधी परातीत तर कधी कान तुटक्या कपात चहा प्यायलो आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्रपालवी या कार्यक्रमात पवार बोलत होते.


चैत्रपालवी या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी त्यांच्या राजकारणातील सुरुवातीच्या काळातील एक गमतीदार किस्सा सांगितला. पवार म्हणाले की, मी पहिल्यांदा निवडणूक लढत होतो, तेव्हा प्रचारासाठी फिरताना एका मतदाराने मला परातीत चहा पिण्यास सांगितले. परंतु मी तेव्हा चहा पीत नसल्यामुळे चहा पिण्यास नकार देत तोंड वाकडं केलं. यावर मतदाराने मला प्रश्न विचारला की, तुम्ही साधा आमचा चहा पीत नाही, तर आमची कामे कसली करणार? त्यानंतर आपलं मत जाईल म्हणून मी तो परातीतला चहा प्यायलो.

पवार एकाच किस्स्यावर थांबले नाहीत, तर ते म्हणाले की, पुढील काळात लोकांच्या जीवनात बदल झाला आणि परातीऐवजी कानतुटक्या कपातून चहा मिळायला लागला. मी तोदेखील प्यायलो. पूर्वीच्या काळात बसायला घोंगडी मिळत होती. त्यानंतर सतरंज्या अंथरल्या जाऊ लागल्या. पुढे खुर्च्या आल्या आणि आता त्याची जागा सोफ्याने घेतली आहे. शेतकऱ्यांच्या राहणीमानातील बदल आणि शेतीत सुधारणा झाल्यामुळे तसेच प्रत्येक घरातल्या मुली शिकू लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे.

काय सांगतात शरद पवारांचे ग्रहतारे? | ग्रहताऱ्यांच्या गल्लीतून दिल्ली | ABP Majha



कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेती आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करायला हवेत, ते अत्यंत गरजेचे आहे.