Sharad Pawar PC : "कोणी काही दावा करेल, पण त्याला काही अर्थ नाही. माझा लोकांवर विश्वास असून उद्यापासून मी दौरा करणार आहे. कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेऊन उद्यापासून लोकांमध्ये जाणार आहे" घोषणा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. कोणी काय भूमिका घेतली आहे यामध्ये न जाता आम्ही लोकांमध्येच जाऊ असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारमुक्त केल्याचा टोलाही पवारांनी पीएम मोदी यांनी लगावला. तसेच शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकप्रकारे बंड केल्याचे सूचित केले आहे. तसेच पक्षांच्या विसंगत कोणी पाऊल टाकलं असेल, तर योग्य नाही असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर थेट भाष्य केले नाही. 


आज जे काही झालं आहे त्याचं श्रेय मोदींना असल्याचा टोलाही शरद पवार यांनी लगावला. भविष्यातही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी शपथ घेतलेल्यांमध्ये हसन मुश्रीफ,छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची नावे वाचून दाखवत ईडीच्या कारवाईने हा निर्णय घेतला असावा, असेही पवार म्हणाले. पक्षाची जबाबदारी देऊनही पार न पाडल्याने प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवार पुढे म्हणाले की, आम्ही 6 जुलैला बैठक बोलावली होती. या बैठकीत काही मुद्यांवर चर्चा करणार होतो. मात्र, तोपर्यंत  पक्षांपासून वेगळी भूमिका घेतली आणि आम्हीच पक्ष अशी भूमिका मांडली. मात्र, एकंदरीत चित्र दोन दिवसात समोर येईल. घड्याळ चिन्हाला काहीही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


मोदींनी पक्षाला भ्रष्टाचारमुक्त केलं


शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचारी पक्ष म्हणून केलेल्या आरोपांचा संदर्भ देत टोला लगावला. शरद पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी स्टेटमेंट केले. पक्ष भ्रष्टाचारात सापडल्याचा उल्लेख केला. भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप केला, पण आज त्या  पक्षातील काही सहकाऱ्यांना सहमती देत पक्षाला भ्रष्टाचारमुक्त केलं आहे. त्यांनी केलेले आरोप वास्तवात नव्हते. ज्यांच्यावर आरोप केले त्यांना मुक्त केले, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. 


आजची सकाळ मला नवीन नाही 


शरद पवार यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवरून जुना 1980 च्या दशकातील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत आजची सकाळ ही माझ्यासाठी नवीन नसल्याचे ते म्हणाले. त्यावेळी मी पाचच लोकांचा नेता झालो होतो, असेही पवार यांनी सांगितले. त्यामुळे कोण सोडून गेले याची चिंता नसून त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता असल्याचे सांगितले. जे आधी सोडून गेले आहेत ते पराभूत झाले आहेत. 


आता अजितदादांचे वरिष्ठ वेगळे असतील


दुसरीकडे, अजित पवार यांनी शपथविधी सोहळ्यानंतर शरद पवारांचा उल्लेखही केला नव्हता. मात्र, वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचे म्हटले होते. यावरून आता अजितदादांचे वरिष्ठ वेगळे असतील, असा टोला लगावला. सोडून गेलेल्यांची चिंता नसून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी वेगळी टीम असेल, आमचे ध्येय पक्षबांधणीचे आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. अजित पवारांशी कोणतीही चर्चा झालेली नाही, खोक्याचा वापर झाला का हे सांगता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 


वेगळी भूमिका घेतली एवढंच म्हणेन


दरम्यान, अजित पवार यांना 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता शरद पवार यांनी ज्यांची नावे आली, त्यांनी आजच संपर्क केला होता. त्यांच्याकूडन बोलावून नावे घेतली असा खुलासा केला आहे. अजित पवारांनी बंड किंवा गद्दारी केली आहे का? या प्रश्नावरी पवार यांनी सावध प्रतिक्रिया देताना वेगळी भूमिका घेतली एवढंच म्हणेन, असे मत मांडले. 


इतर महत्वाच्या बातम्या