अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. “लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं” असं म्हणत कर्जमाफीचाही समाचार पवारांनी घेतला. सातत्याने होणारी इंधन दरवाढ, महागाई, बुलेट ट्रेन आणि कर्जमाफीवर आदी विषयांवर पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अहमदनगरमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानंतर बोलताना पवारांनी सरकारवर निशाणा साधला.


दरम्यान देशात सातत्यान होणारी इंधन दरवाढ मागे घेण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. तसंच बुलेट ट्रेनचा निर्णय दुर्दैवी असल्याचा आरोप केला आहे. कर्जमाफीवर बोलताना “लबाडा घरचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं” असं म्हणत जोरदार घणाघात केला आहे.

महागाई विरोधात शिवसेनेनं सत्तेत राहून नव्हे तर आमच्या सारखं रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचं आवाहन पवारांनी केलं. रामदास आठवलेंना कोणीच गांभिर्यानं घेत नसल्याचं म्हणत त्यांनी आठवलेंची खिल्ली उडवली.

इंधन दरवाढीवर नाराजी

शरद पवारांनी देशातील इंधन दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत इंधन दरवाढीची गरज नव्हती. देशात सामान्य जनतेला त्रास होत आहे. त्यामुळं सामान्य जनतेचा रोषानंतर दरवाढ मागे घेण्याची गरज पवारांनी व्यक्त केली आहे.

बुलेट ट्रेनचा निर्णय दुर्दैवी

बुलेट ट्रेन हा केंद्राचा आणि राज्याचा दुर्दैवी निर्णय असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. देशातील रेल्वेला आज अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. दर्जा, स्वच्छता, सुरक्षेसह पायाभूत सुविधांचा रेल्वेमध्ये अभाव आहे. मात्र रेल्वेत सुधारणा करण्याऐवजी सरकारनं बुलेट ट्रेनला प्राधान्य दिल्याचा आरोप पवारांनी केला.
राज्याला बुलेट ट्रेनची आवश्यकता नसताना विनाकारण त्याचा भार राज्यावर पडल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

बुलेट ट्रेननं राज्यावर अन्याय झाला असून चंद्रपूर, मुंबई आणि पुण्याला जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.  या प्रकल्पात देशाचा विचार करायची गरज होती. मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली मार्गानं बुलेट ट्रेन गेल्यास इतर राज्यांना फायदा झाला असता असंही पवारांनी म्हटलंय. मात्र गुजरात आणि केंद्रानं घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असल्याचा आरोप पवारांनी केला.

कर्जमाफीवरुन सरकारवर पवारांचा घणाघात

कर्जमाफीवर बोलताना पवारांनी “लबाडा घरचं आवतन जेवल्या शिवाय खरं नसतं” असं म्हटलं आहे. सरकारनं संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली, आम्ही  सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र त्यातील संपूर्ण शब्द गेला असून आतापर्यंत सहा नवीन जीआर काढल्याचा आरोप पवारांनी केला. सरकारनं कर्जमाफीत तारतम्य ठेवलं नसल्याचा आरोपही पवारांनी केला आहे.

शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडून आंदोलन करावं

महागाईवर सेनेच्या आंदोलनावर मार्मिक टीका शरद पवारांनी केली. शिवसेनेनं सत्तेत राहून नव्हे तर सत्तेबाहेर पडून आमच्या सारखं रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचं आवाहन पवारांनी केलं.
महागाई विरोधात सेना रस्त्यावर उतरल्याचं आम्ही स्वागत करतो. मात्र सरकारमध्ये राहून ही भूमिका बरोबर दिसत नसल्याचं पवारांनी म्हटलं. सरकारमध्ये राहून परिस्थिती सुधारा आणि सुधारत नसेल तर आमच्या सारखं रस्त्यावर येऊन आंदोलन करा असं आवाहन पवारांनी केलं.