पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 15 रुपये हे शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेतले जाणार, शंभूराज देसाईंची माहिती
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊसाला प्रती टन 15 रुपये हे शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेतले जाणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.
Shambhuraj Desai : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊसाला प्रती टन 15 रुपये हे शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेतले जाणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र सहकारी साखर कारखाना संघाची पहिल्यापासूनच पद्धत आहे ही गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी बैठक होत असते. या बैठकीत नैसर्गिक आपत्ती, पूर , दुष्काळ आला की प्रतिटना मागे साखर कारखाने पैसे देत असतात. शेतकऱ्याचे पैसे घेतले असा त्याचा अर्थ होत नाही असे देसाई म्हणाले.
60 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले
साखर कारखान्यांना स्वतःच्या उत्पन्नातील पैसे द्यायचे आहेत, असा त्याचा अर्थ आहे असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. हे संकट मोठं आहे. 60 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळं मदत करावीच लागणार आहे. साखर उद्योगाची थोडी मदत व्हावी, हा त्या मागचा उद्देश असल्याचे देखील देसाई यांनी सांगितले. विरोधकांकडून हा जिजिया कर असल्याच्या टिकेला उत्तर देताना हा कर शेतकऱ्यांकडून घेतला जाणार नाही तर कारखाने देणार असल्याचे देसाई म्हणाले. शरद पवार मुख्यमंत्री असताना किल्लारी भूकंपावेळी कारखान्यांनी 2 रुपये कर दिलाच होता मग तो जिजिया कर होता का असा सवाल देसाई यांनी केला आहे.
सांगूनसुद्धा संबंधित व्यक्तीमध्ये बदल होत नसेल तर... पडळकरांच्या वक्तव्यावर देसाईंची प्रतिक्रिया
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपवर जहरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना सुनावले होते. एखाद्या पक्षाच्या प्रमुखांनी कडक शब्दात वारंवार सांगून सुद्धा संबंधित व्यक्तीमध्ये बदल होत नसेल तर ज्याने त्याने समजून घेतले पाहिजे. यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही असे शंभूराज देसाई म्हणाले.























