मुंबई : औरंगजेबाच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) सुरू असलेला राज्यातील हिंसाचार पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता औरंगजेबचा मुद्दा संयुक्तिक नाही असं संघाने म्हटलं आहे. त्याच वेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली तीच शिवसेनेची भूमिका असल्याचं राज्याचे मंत्री शंभुराज देसाई म्हणाले. औरंगजेबची कबर महाराष्ट्रात कशाला हवी असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.
राज्यात औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला असून नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा संयुक्तिक नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर शिवसेनेची भूमिका मांडताना शंभुराज देसाई म्हणाले की, "आरएसएस स्वतंत्र संघटना आहे. ज्या औरंगजेबाने क्रूरपणे संभाजी महाराजांचे हाल केले, त्यांच्या विरोधात कटकारस्थान केले त्या औरंगजेबाचा आम्ही कायम विरोध करत राहू. संघाने जरी संयुक्तिक भूमिका नसली तरी म्हटलं असलं तरी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली तीच आमच्या पक्षाची भूमिका राहील."
शिवभक्तांची भूमिका तीच आपली भूमिका : एकनाथ शिंदे
औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, शिवभक्तांच्या भावनांचा आदर मी करतो, औरंगजेबानं संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि औरंगजेबाचे क्रौर्य, त्या क्रौर्याची परिसीमा त्याने गाठली होती. अशा औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे."
जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. तो महाराष्ट्राचा दुश्मन होता, देशद्रोही, राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याच्या खाणाखुणा महाराष्ट्रात कशाला पाहिजे. जे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
हा मुद्दा संयुक्तिक नाही, संघाची भूमिका
छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारांशी जोडलेल्या बंजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन सुरू केलं आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका, महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर नको, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. त्यातच, महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्याने येणाऱ्या वक्तव्यावरूनही दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे, राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय प्रचारत सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली.
ही बातमी वाचा: