बीड : कावळा फांदीवर बसायला आणि फांदी तुटायला असा वाक्यप्रचार आपण नेहमी बोलताना वापरतो. अशीच एक घटना बीडमध्ये घडली आहे. रस्त्यावरुन सुसाट जाणाऱ्या गाडीची लाईट अचानक बंद पडते आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडते. दैव बलवत्तर म्हणून या भयंकर अपघातातून तिघेजण सहीसलामत बाहेर आलेत.


ही घटना आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव या फाट्यावरती अमरापूर-बारामती या रोडवरुन जाताना रात्री नऊच्या सुमारास घडली. या रस्त्याचे नव्याने चौपदरीकरण झाले आहे, त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढली आणि रस्त्याच्या कडेला असलेली विहीर ही झाडांनी वेढली गेली असल्याने ती अशी फारशी लक्षात येत नाही.


शिक्षणाचा नवा "बीड पॅटर्न", दहावीच्या 47,000 विद्यार्थ्यांना घरबसल्या मोफत शिक्षण


करण राजू पवार, नितीन अशोक गुंड, बालू शहादेव गुंड आष्टी तालुक्यातील वाघळुज या ठिकाणचे राहणारे आहेत. हे तिघेजण जालन्याला एका लग्नासाठी गेले होते. लग्न होऊन गावी परत येत असताना रात्री नऊ ते साडेनऊची वेळ होती. या देवीनिमगाव फाट्याजवळ गाडी आल्यानंतर अचानक गाडीची लाईट बंद झाली. त्यामुळे चालकाचा गाडीवरचा नियंत्रण सुटलं आणि क्षणार्धात गाडी थेट विहिरीत जाऊन पडली.


स्कार्पिओ गाडी जावळी या विहिरीत पडली. त्यावेळी सगळा काळोख पसरलेला होता. त्यामुळे नेमकं काय झालं हेच या तिघांच्या लक्षात आलं नाही. पण गाडी ज्या वेळी या विहिरीच्या पाण्यामध्ये बुडत होती. त्यावेळी मात्र तिघांनीही बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. नेमके याच वेळी देवीनिमगाव येथील शिक्षक सचिन मार्कंडे व महाराज फाळके हे दोघे गावाकडे जात असताना त्यांनी हा अपघात पाहताच जखमींना तात्काळ या विहीरीतून बाहेर काढले. दैव बलवत्तर होतं म्हणून एवढ्या विचित्र अपघातानंतर सुद्धा या तिघांनाही फारसा काही मार लागला नाही. जवळच्याच कड्याच्या आरोग्य केंद्रामध्ये त्याच्यावरती उपचार चालू आहेत. आज दुपारी या विहिरीमधून ट्रेन लावून ही गाडी बाहेर काढण्यात आली आहे.


बीडमध्ये स्वत: लावलेल्या आगीतच डॉक्टरचा होरपळून मृत्यू, पैशाच्या कमिशनवरून मेडिकल चालकासोबत वाद