Satej Patil on Mahayuti Government: “सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शपथेचा हरताळ फासण्याचा प्रकार आहे,” अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil on Mahayuti Government) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे निधीच्या आमिषाने मतं मिळणार नाहीत, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील भारतवीर मित्र मंडळाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने म्हैस पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते. म्हैस आपल्या मालकाच्या दुचाकी वाहनाचा आवाज ऐकून त्याच्या मागून ती पळत जाते. या स्पर्धेत यंदा काही मुलींनी देखील दुचाकी वाहन चालवत आपल्या म्हशीला पळवलं आहे. या स्पर्धेच्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली.
मनसेबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना पाटील म्हणाले, “महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अनेक ठिकाणी आघाड्या होतील, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढा द्यावा लागेल. मनसेबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.” भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. “रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईतील प्रकल्प एकाच व्यक्तीला देऊन महाराष्ट्र विकण्याचं काम हे सरकार करत आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी एफआरपीवर तोडगा काढावा
अजित पवार गटाबाबत सतेज पाटील म्हणाले की, “भाजपला सत्तेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीचे दोन्ही गट हवे होते; आता ते संपवण्याचे कामच सुरू आहे.” पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात त्यांनी टेंडर रद्द करून नवे काढण्याची मागणी केली. ऊस हंगामाबाबत पाटील म्हणाले की, “कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी एफआरपीवर तोडगा काढावा. आम्ही सत्तेत असताना राजू शेट्टींसह चर्चा करून तोडगा काढत होतो.”
इतर महत्वाच्या बातम्या