शक्तिपीठ महामार्गावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल; राजू शेट्टींचाही महायुती सरकारवर प्रहार
“आमच्या जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला” अशा संतप्त घोषणा देत शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. 350 वर लोकसंख्या असलेल्या गावात सध्या 600 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Satej Patil and Raju Shetti on Shaktipeeth Expressway: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला परभणी जिल्ह्यात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. सहजपूर जवळामध्ये आज (20 फेब्रुवारी) शेतकरी थेट रस्त्यावर उतरले. “आमच्या जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला” अशा संतप्त घोषणा देत त्यांनी भूसंपादनाला कडाडून विरोध दर्शवला. अवघ्या 350 वर लोकसंख्या असलेल्या गावात सध्या 600 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली
दरम्यान, शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर झाल्यानंतर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. सतेज पाटील यांनी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठल्याची टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यात सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतीपुर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलयं हे नक्की. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध.
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत… pic.twitter.com/CYNNWIr4C0
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) February 20, 2026
राजू शेट्टींचाही प्रहार
राजू शेट्टी यांनीही फडणवीस यांच्यावर प्रहार केला आहे. पोलिसाकडून शेतकऱ्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून रानातून हाकलून लावण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाद्वारे शक्तीपीठांना जोडण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र, कोणीही अशा महामार्गाची मागणी केली नस्लयाचे सांगत शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने आराखड्यात बदल करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, कोल्हापूर जिल्ह्यात कागल व हातकणंगले तालुक्यात भूसंपादनाला विरोध असलेला भाग प्रकल्पातून वगळला. तसेच नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि धाराशिव जिल्ह्यांतही काही बदल करण्यात आले. तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























