Satej Patil on Madhuri Elephant: वनताराचे सीईओ काल कोल्हापूरमध्ये आले. मात्र, या बैठकीला विरोधी पक्षातील एकाही आमदाराला बोलावलं नाही. त्यामुळे या बैठकीमध्ये काय नेमकं झालं? याची माहिती नाही. महादेवी हत्ती तातडीने पाठवतो असं वनताराचे सीईओ म्हटले आहेत का? असा सवाल काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणीमधील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सतेज पाटील यांच्या माध्यमातून स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी 2 लाख 4 हजार 421 जणांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही स्वाक्षरी मोहीम सुरू होती. यामध्ये ऑनलाइन एक फॉर्म देण्यात आला होता. महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांचे अर्जाचे प्रिंट काढले आहेत. नांदणी मठाच्या स्वामींच्या हस्ते या पत्रांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आज पोस्टाच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या स्वाक्षऱ्यांचे निवदेन पाठवण्यात आले.
उच्चाधिकार समितीला तत्काळ अर्ज करावा
दरम्यान, भावनेचा आदर राखत वनतारा प्रशासनाने महादेवी हत्तीणीला परत नांदणी येथे पाठवण्यासाठी उच्चाधिकार समितीला तत्काळ अर्ज करावा. वनतारा प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वनतारा समितीच्या बैठकीत काय निर्णय झाला? हे जाणून घेण्यासाठी शेकडो नागरिक नांदणी मठात दाखल होते. रात्री उशिरा महास्वामींनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत आहात हे आज दाखवून दिले. आपण सर्व काही गोष्टी संयमाने जिंकू शकतो, हे आज दिसून आले. तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच वनतारा प्रशासनाला कोल्हापुरात यावे लागले. सर्वधर्मीयांची सहानुभूती याच्यासाठी लाभली आहे. या जनसमुदायाबरोबर राजकीय नेते मंडळींनीदेखील माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावं, ही माझी भावना आहे. हे गुरुपीठ 743 गावांचे नव्हे तर आज अखंड जगभराचे झाले आहे. या गुरुपीठाच्या पाठीशी सर्वांनीच कायमपणे उभे राहावे, असे आवाहन मठाधिपती यांनी केले.
नांदणी मठाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात
दुसरीकडे, वनतारा सीईओंसोबत झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, नांदणी मठाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात. जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्यापद्धतीने कार्यवाही करू. आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असं वनताराच्या सीईओंनी म्हटल्याचं आबिटकरांनी माहिती दिली.
इतर महत्वाच्या बातम्या