साताऱ्यात कारला टेम्पोची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 14 Apr 2016 06:56 AM (IST)
सातार : साताराजवळील महामार्गावर उभ्या असलेल्या कारला टेम्पोने धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील कवठे या ठिकाणी हा अपघात घडला. ही कार मुंबईतून इचलकरंजीकडे निघाली होती. गाडीचा टायर फुटल्याने ही गाडी रस्त्याच्या कडेला लावून सगळेजण टायर बदलत होते. मात्र त्याचवेळी मागून आलेल्या टेम्पोने कारला जोरदार धडक दिली आणि गाडीबाहेर उभे असलेले तीन जण जागीच मृत्यूमुखी पडले. तर गाडीत बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. परशुराम लोहार, मारुती कांबळे, संजय सुतार अशी मृत पावलेल्या तिघांची नावे असून हे सर्वजण इचलकरंजी येथील राहणारे आहेत.