सातारा : गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील महिंद गावात ही घटना घडली आहे. काल घराच्या छतावर खेळत असताना ही घटना घडली. शेजल यादव आणि अनुष्का यादव अशी दोन चिमुकल्यांची नावे आहेत. शेजल आठ वर्षाची तर अनुष्का अकरा वर्षाची आहे. गांधील माशांच्या या हल्ल्यात आणखी दोन मुलींसह दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेने महिंद गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


माहितीनुसार महिंद गावात घराच्या छतावर खेळत असताना या मुलींवर गांधील माशांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या शेजल यादव आणि अनुष्का यादव यांचा मृत्यू झाला. या दोन मुलींसह आणखी दोन मुली घराच्या छतावर खेळत होत्या. त्याच वेळी माकडांचा एक कळप घरांवरुन उड्या मारुन जात होता. त्याच वेळी एका माकडाचा धक्का गांधील माशांच्या पोळ्याला लागला आणि चिडलेल्या गांधील माशांनी छतावर असलेल्या मुलीवर हल्ला चढवला.


ओरडण्याचा आणि रडण्याच्या आवाजाने या मुलींच्या कुटुंबातील दोन महिला छतावर आल्या. तेव्हा त्यांनाही या गांधील माशांनी चावा घेतला. शेजल आणि अनुष्का गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोन्ही मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


उपचार सुरु असताना अनुष्काचा मृत्यू झाला तर शेजलसह उर्वरीत सर्वांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले होते. शेजलला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी तळमावले या ठिकाणी नेण्यात आले. मात्र शेजलने उपचारास फारसा प्रतिसाद दिला नाही आणि तिचाही मृत्यू झाला.


या घटनेतील अनुष्का ही मुळची कराड तालुक्यातील येळगाव येथील असून लॉकडाऊनमुळे गेली चार महिन्यापासून ती नातेवाईकांकडे राहायला आली होती. तळमावले पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि वन विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन अधिक माहिती घेतली. या घटनेमुळे मात्र महिंद गावपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.