सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी काल (बुधावरी) मराठा आरक्षणावर विष पिणार असल्याचे पत्रकातून सांगितले असताना आता काही तासातच उदयनराजेंनी पुन्हा वेगळी भुमिका घेत आम्ही विष पिणार नाही तर पाजणार असल्याची धमकी सत्ताधाऱ्यांना दिली. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले हे काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
शरद पवार, अजित पवार, यांच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गाठी भेटी घेऊन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले म्हणणे मांडले होते. काल ते साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी एका पत्रकातून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर आम्हाला विष पिऊद्या असे सांगितले होते. आज मात्र उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांना विष पाजणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांना खुप कळते तर त्यांनी श्वेत पत्रीका सादर कावी अशी मागणी करत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मराठा समाज आक्रमक होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या बोलण्यातील महत्वाचे मुद्दे
- विष पिण्याबाबत परवानगी मागितली नाही तर मी म्हणालो, त्याशिवाय पर्याय उरला नाही. राज्य सरकारने तशी परिस्थिती तयार केली.
- मराठा कुटुंबाता मी जन्मलो म्हणून नाही तर प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजेत असं वाटतं, मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना फस्ट्रेक्शन येणार नाही का?
- अनेकांनी आत्महत्या केल्या. राज्यसरकारची माणस कोर्टात हजर होत नाहीत. श्वेतपत्रिका आणा, लोकांना कळूद्या तुम्ही काय दिवे लावले.
- जगात जात नसती तर निम्यापेक्षा मृत्यू झाले नसते. सगळे एकत्र खेळले ते आता एकमेकांशी बोलत नाहीत. मी अनेकांना भेटलो त्याचा उपयोग झाला नाही असे वाटते.
- कॉमनसेन्स कुठं गेला, जनाची नाय मनाचीतरी थोडी राखा.
- अजित पवार यांच्या वक्तव्यावर - तुम्ही काय केलं हे दाखवा. तुम्ही स्वतःला तज्ञ समजता तर सांगा ना आणि श्वेतपत्रीका दाखवा ना.
- पुढचा मार्ग? माझा पुढचा मार्ग माझ्याकडे राहिला नाही. लोकांचा उद्रेक होईल, कापतील लोक, लोकांनी निवडून दिले त्यांनी सांगा काय केलं? सांगा त्यांना आम्हाला तुम्हाला ठेचायचं होतं. यांना मुकबधीर शाळेत टाका.
- आता विष पिणार नाहीत तर पाजणार. यांची वाट लावा आता, सत्तेत बसणारे, ज्या भावनेने निवडून दिले त्यांना न्याय द्या.
- हे राजकाराण नाही तर गचकरण झाले आहे. मतदार जागा दाखवतील. जशी बेकारी होईल तसे मतदार सगळे दाखवतील.
- राज्य सरकारबद्दल मत - तुमच काय मत आहे सांगा. मी क्रॅक झालोय. सगळे तज्ञ आहेत. गाडा पुढे ढकलायचे सुरू आहे.