परभणी : ग्रामपंचायतच्या मासिक सभेत सत्ताधारी आणि विरोधक दोन गटात वाद झाला, वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. परस्पर विरोधी गुन्हे ही दाखल झाले. परंतु यातील अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल होऊन अटक न झालेल्या सरपंचाने आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश घेतलाय. त्यामुळे सामान्यांसाठी पोलिसांचा एक न्याय आणि नेत्यांसाठी वेगळा न्याय का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय.


परभणीच्या सेलु तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वालूर ग्राम पंचायतच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप नेते संजय साडेगावकर यांच्या गटाला 17 पैकी 11 जागा मिळाल्या तर विरोधी गट चंद्रकांत चौधरी यांच्या गटाला 6 जागा मिळाल्या.  यानंतर मागच्या 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ग्राम पंचायतची मासिक सभा होती. या सभेत प्रवेशावरूनच सत्ताधारी सरपंच संजय साडेगावकर व विरोधी गटातील सदस्य यांच्यात वाद झाला. शिवाय विरोधी सदस्य सतीश कलाल, लिंबाजी कुपनवार,धारोजी धाबे,चंद्रकांत चौधरी गावातील विविध कामे,पाणीटंचाई या बरोबरच 15 वित्त आयोगाबाबत चर्चा केली असता त्यांना खुर्च्या फेकून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. याबाबत लिंबाजी कुपनवार यांच्या फिर्यादी वरून सरपंच संजय साडेगावकर व रामराव बोडके यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ करणे,लिंबाजी कुपनवार यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सेलु पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच याच प्रकरणात सरपंच संजय साडेगावकर यांनीही पोलिसात गुन्हा नोंदवला.ज्यात त्यांनी ग्राम पंचायत सदस्य लिंबाजी कुपनवार,सतीश कलाल,गणपत कलाल,चंद्रकांत चोधरी व धारोजी धाबे या सर्वानी मला शिवीगाळ करून मारहाण करत दोन तोळ्यांची सोन्याची चेन काढून घेतली अशी तक्रार दिली ज्यावरून या पाच जणांविरोधात कलम 327, 323, 504, 506, 34, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या दोन्ही प्रकरणात  एकाही व्यक्तीला अटक करण्यात आली नसून या दोन्ही गटाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. 


खासदारांच्या उपस्थितीत साडेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश 


ग्रामपंचायतच्या मासिक सभेत झालेल्या गंभीर प्रकरणानंतर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल असलेले वालुरचे सरपंच संजय साडेगावकर यांनी आपल्या समर्थकांसह काल 8 मार्च रोजी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे. शहरातील खासदार कार्यालयात हा प्रवेश पार पडलाय.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल,शिवाय त्यांना जामीन ही मंजूर नाही असं असताना साडेगावकर यांना पक्षात घेणं हे कितपत योग्य आहे, याचा शिवसेनेच्या नेत्यांनी विचार करायला हवा अशी चर्चा सर्वत्र आहे. संजय साडेगावकर हे पूर्वीचे शिवसेनिक मात्र मध्यंतरी ते भाजप मध्ये गेले होते पण भाजपच्या पदाचाही त्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांनी ही निवडणूक लढवून विजय मिळवला होता ते आता परत सेनेत परतले आहेत.  


या प्रकरणात गुन्हा दाखल असताना सरपंचांना अटक होत नाही अन् ते थेट पक्षात प्रवेश घेतात याबाबत आम्ही सेलुचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी राजेंद्र पाल यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलो असता, मला या प्रकारणात बोलता येणार नाही समितीने अहवाल दिल्यानंतर मी सर्व रिपोर्ट पाहून बोलेल. सध्या मी आरटीपीसीआर तपासणीसाठी आलो असल्याचे सांगून पाल यांनी कॅमऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय.