Santosh Deshmukh Murder Case And Walmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजले. या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे या हत्या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याने यात पुढे नेमके काय होणार? देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, या हत्या प्रकरणात मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याचा दाखल आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. एकाप्रकारे तोच या हत्येत मास्टरमाईंड असल्याचे आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे. 

1) प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख

सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड याचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख आहे. एकूण आरोपींत वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक एक आहे. त्यानंतर आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. 

2) कराडने फोनवरून मागितली खंडणी 

आरोपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे 29 नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुले याच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता.  

3) पाच साक्षीदारांची साक्ष 

या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना सीआयडीला पाच महत्त्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर सीआयडीने वाल्मिक कराडविरोधात सर्व पुरावे गोळा केलेले आहेत. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे.

4) कराडने सुदर्शन घुले याला सांगितलं, कुणालाही सोडणार नाही 

सात तारखेला सुदर्शन घुले याने वाल्मिक कराड यास कॉल केला होता. त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन घुले याला सांगितले की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण कुणालाही सोडणार नाही. सुदर्शन घुले आणि कराड यांच्यात हा संवाद झाल्यानंतर घुले याने अवादा या कंपनीत परत कॉल केला आणि धमकी दिली, असेही आरोपपत्रात नमूद आहे.

5) संतोष देशमुख यांना कायमचा धडा शिकवा, कराडचा संदेश 

यानंतर आठ तारखेला एकूण पाच साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबत होता. नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती. या भेटीत विष्णू चाटे याने घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा संदेश होता, असे सीआयडीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद आहे. 

हेही वाचा :

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार; अवादा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट

मोठी बातमी! वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार, दुसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या आठ आरोपींचे क्रमांक