Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणातील चार फरार आरोपींच्या खाती असलेल्या 13 बँकांना सीआयडीच्या पथकाने खाती गोठवण्यासाठी पत्र दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चार फरारी आरोपींची बँक खात्यांची संख्या ही तीन आकड्यात आहे. आरोपींचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वरील माहितीशी संलग्न असलेले ही सर्व खाती आहेत.
आज दिवसभरात नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील चार फरार आरोपींच्या खाती असलेल्या 13 बँकांना सीआयडीच्या पथकाने खाती गोठवण्यासाठी पत्र दिल्याची माहिती.
मालमत्ता जप्तीच्या संदर्भात सीआयडी पथकाने कार्यवाही पूर्ण केली असून न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा सध्या केली जात आहे. न्यायलयाचे आदेश प्राप्त होतात जप्तीची कारवाई देखील केली जाणार आहे.
आज दिवसभरात सीआयडीच्या पथकाने सुमारे 25 लोकांशी चौकशी केली आहे.
आतापर्यंत सीआयडीच्या पथकाने सुमारे 125 हून अधिक लोकांची प्राथमिक चौकशी केली आहे.
वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या ज्या महिलेची काल CID पथकने चौकशी केली होती, त्याच महिलेची आज पुन्हा एकदा सीआयडीच्या पथकाने चौकशी केली आहे. या महिलेकडे वाल्मीक कराड हा सुरुवातीच्या काही दिवस राहायला होता, अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील दहशत आणि बीडमधील गुंडागर्दीचा मुद्दा समोर आला असून बीडचा बिहार होत असल्याची टीकाही केली जात आहे. राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनीही बीडसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. बीड जिल्ह्यात 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी सर्वच नेत्यांनी केली. त्यासह, वाल्मिक कराडच या घटनेतील मुख्य सुत्रधार असून त्यालाही अटक करण्याची मागणी आमदार, खासदार व स्थानिक नेत्यांनी केली. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारेन, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. तर, धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचंही नेत्यांनी म्हटलं होतं.