नवी दिल्ली : आज नवी दिल्लीत संसद रत्न पुरस्कार (Sansad Ratna Award) प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. तर भाजपच्या खासदार स्मिता वाघ, खासदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. हेमंत सावरा यांना देखील संसद रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं आहे.
नवी दिल्लीत मोठ्या दिमाखात संसद रत्न पुरस्काराचा सोहळा आज पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या दोन खासदारांना तर भाजपच्या तीन खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं आहे.
दुसऱ्यांदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्केंना`संसद रत्न' पुरस्कार प्रदान
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महत्त्वाच्या विविध मुद्यांवर तसेच अर्थसंकल्पावर, सरकारच्या धोरणांवर केंद्र सरकारची बाजू भक्कमपणे मांडणारे, विविध विभागांवर प्रश्नोत्तरे विचारणारे, संसदेतील उपस्थितीत अव्वल असणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी मानाचा `संसद रत्न' पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. संसदेत आपल्या अभ्यासपूर्ण भाषण देणारे खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनाही दुसऱ्यांदा 'संसद रत्न ' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार दोन्ही खासदारांना प्रदान करण्यात आल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि संसदरत्न अवॉर्ड कमिटी यांच्या वतीने देण्यात येणारा 16 वा संसद रत्न पुरस्कार 2026 आज, सायंकाळी 5 वाजता नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील भीम हॉलमध्ये प्रदान आला. भारत सरकारचे केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री तसेच ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई, पुरस्कार ज्युरी समितीचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या विशेष उपस्थितीत खासदार डॉ .श्रीकांत शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावर्षी मला सलग दुसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळत आहे. पदार्पणापासूनच सलग दुसऱ्या वर्षी हा सन्मान मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी संसदेत खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच संसदेत सातत्याने सहकार्य करणारे गटनेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानतो. शिंदे साहेबांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे, शिवसेना आणि महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे मिळाली आहे. निवडणुकीच्या काळात मला निवडून आणण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने घेतलेले कष्ट माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. त्यामुळे हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आणि माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्याचा सन्मान आहे, अशी भावना पुरस्कार मिळाल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.
जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला तो कायम जपणं, ही माझ्यावर असलेली सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्या विश्वासाला पात्र ठरत प्रामाणिकपणे, सातत्याने आणि जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून काम करत राहीन. संसद रत्न पुरस्कार सलग दुसऱ्यांदा मिळाल्याने माझी जबाबदारी आणखी वाढली, भविष्यातही मतदारसंघातील प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी भावना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.