मुंबई : महाराष्ट्रातील नाट्य परंपरा ही अतिशय समृद्ध आणि ऐतिहासिक आहे. एकीकडे अभिनेता परेश रावलने मराठी नाटक परंपरेबद्दल गौरवाने उद्गार काढल्यानंतर अनेकांना त्याचा अभिमान वाटला. त्याचवेळी दुसरीकडे मराठी नाट्यमंदिरांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय होत असून त्याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष होत आहे. या आधी अनेक कलाकारांनी वेळोवेळी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता संकर्षण कराडेनेही (Sankarshan Karhade) तशाच आशयाची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या परभणीत कलाकृतींची, कलाकारांची परंपरा आहे, तिथे तिथल्याच कलाकारांचे व्यावसायिक नाटक हे नाट्यमंदिराच्या दुरवस्थेमुळे होऊ शकत नाही अशी खंत त्याने व्यक्त केली. 

परभणीच्या रंगमंदिरांची दुरवस्था ही केवळ एक प्रशासकीय दुर्लक्षाची बाब नाही, तर ती एका कलाकारांच्या मनाला वेदना देणारी परिस्थिती आहे. अभिनेता आणि लेखक संकर्षण कराडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत परभणीमधील रंगमंचाच्या (Parbhani Natyamandir) हालाखीबाबत तीव्र खंत व्यक्त केली आहे. संकर्षण कराडेची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'कुटुंब किर्रतन' या त्यांच्या व्यावसायिक नाटकाचा मराठवाडा दौरा नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. मात्र त्याचे मूळगाव परभणी मात्र त्या यादीत नसल्याचे त्याने दुःखाने नमूद केले. परभणीतील नाट्यमंदिराची अत्यंत खराब अवस्था हे त्यामागे कारण असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

Sankarshan Karhade Post : परभणीत नाटक नाही याची खंत

'ज्या परभणीत कलाकृतींची, कलाकारांची परंपरा आहे, तिथे तिथल्याच कलाकारांचे व्यावसायिक नाटक होऊ शकत नाही हे खूप वाईट वाटतं' अशी खंत संकर्षण कराडेने व्यक्त केली. परभणीला रंगभूमीचा समृद्ध वारसा असूनही तिथल्या नाट्यमंदिरांची झालेली दयनीय अवस्था पाहून मनाला चटका लागतो असं संकर्षण म्हणतो. असं असलं तरी त्याने एक आशाही व्यक्त केली आहे.  'आपलं गाव ते आपलं गाव. प्रेम तितकंच आहे. कधीतरी इथेही प्रयोग होईल अशी आशा' असं त्याने म्हटलं आहे. 

Problems Of Theatre In Maharashtra : राज्यातील नाट्यमंदिरांसंबंधी समस्या काय?

भौतिक सुविधा तोकड्या

अनेक ठिकाणी रंगमंचाची अवस्था खराब आहे. लाईटिंग, साऊंड सिस्टम, बसण्याची व्यवस्था, शौचालयं आणि व्हेंटिलेशन सिस्टिम यांची कमतरता आहे.

देखभाल आणि दुरुस्ती अभाव

अनेक नाट्यमंदिरांची वर्षानुवर्षे दुरुस्ती झाली नाही. गळकी छतं, मोडकळीस आलेली खुर्च्या, ओलसर भिंती यामुळे प्रेक्षक आणि कलाकार दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागतो.

नवे तंत्रज्ञान अनुपस्थित

आधुनिक युगातही बहुतांश नाट्यमंदिरांमध्ये डिजिटल साउंड सिस्टीम, प्रोजेक्शन यंत्रणा, फायर सेफ्टी साधने वगैरे अपूर्ण आहेत.

आरक्षण आणि भाडे धोरणात पारदर्शकतेचा अभाव

नाट्यमंदिरं काही खास मंडळांनाच सहज उपलब्ध होतात, तर स्वतंत्र किंवा नवोदित कलाकारांना अडचणींना सामोरे जावे लागते असा आरोप या आधी अनेकांनी केला आहे.

Maharashtra Natyamandir Problems : नाट्यमंदिरांकडे सरकारचे दुर्लक्ष

राज्यातील नाट्यमंदिरांच्या अवस्थेकडे राज्य सरकारचेही दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय. राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत नाट्यमंदिरांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. पण ही योजना कादगावरच राहिल्याचं दिसून येतंय. राज्यात 'रंगभूमी प्रोत्साहन योजना' ही प्रभावीपणे राबवली जात नाही. तसेच यासंबंधी पारदर्शकतेचा अभाव आणि निविदा प्रक्रियेत दिरंगाई यामुळे योजनांचा लाभ रंगकर्मींना होत नाही.

महाराष्ट्रातले नाट्यमंदिर हे एक सांस्कृतिक ठेवा आहे. पण प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही परंपरा संकटात आल्याचं दिसतंय. प्रेक्षकसंख्येत घट, तरुण पिढीचा रंगभूमीकडे कमी ओढ आणि नाट्यगृहांची दयनीय अवस्था यामुळे भविष्यात नाटकांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.