मुंबई : उद्धव ठाकरेंना पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायला भाजपने तयारी दर्शवली होती, पण संजय राऊतांनी त्यामध्ये खोडा घातला. त्यामुळेच आमचा संजय राऊत यांच्यावर राग आहे असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केलं. संजय राऊतांचे शरद पवारांवर प्रेम आहे त्याला कुणाचाही हरकत नाही, पण त्यासाठी त्यांनी स्वतःच्या पक्षाची वाट लावली अशी टीकाही शिरसाट यांनी केली. संजय शिरसाट हे एबीपी माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते. 


काय म्हणाले संजय शिरसाट?


संजय शिरसाट म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेनेला बहुमत दिलं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू झाला. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावं अशी मागणी शिवसेनेची होती. पण संजय राऊत त्यावेळी उद्धव ठाकरेंचं कान भरायचे. त्यामुळे हा वाद वाढतच गेला. शेवटी पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यायला भाजपने तयारी दर्शवली. त्यासाठी सेनेकडून कुणीतरी चर्चेसाठी यावं अशी मागणी केली. पण संजय राऊतांनी त्यामध्ये खोडा घातला. त्यांची गाडी सिल्व्हर ओकच्या दिशेने निघाली होती. जर भाजपसोबत चर्चा करायचीच नव्हती तर एवढं सगळं करायची काय गरज होती?


तुला जायचे असेल तर जा, ठाकरेंनी शिंदेंना सांगितलं 


संजय शिरसाट पुढे म्हणाले की, शिवसेना-भाजपची ही युती तुटू नये यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांनीही त्यासाठी प्रयत्न केला. पण 'तुला जायचे असेल तर तू जा' असं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना म्हणाले आणि आमचा नाईलाज झाला. हे जे काही घडलं ते संजय राऊतांमुळे. त्यामुळे आमचा त्यांच्यावर जास्त राग आहे. 


उद्धव ठाकरेंना परिणाम भोगावा लागणार, 'धर्मवीर'मधील सीनवर काय म्हणाले संजय शिरसाट? 


धर्मवीर चित्रपटात संजय शिरसाट यांच्यावर एक सीन दाखवण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावूनही बराच वेळ बाहेर थांबवलं आणि नंतर भेटही दिली नाही असं त्यामध्ये दाखवण्यात आलं आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मला वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावूनही आत घेतलं नाही. शेवटी मी परत निघालो. परत वडाळापर्यंत पोहोचल्यावर मिलिंद नार्वेकरांचा फोन आला आणि उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावल्याचं सांगितलं. त्यावेळी परत आल्यानंतर उद्धव ठाकरे माझ्यासमोरून निघून गेले. त्यावेळी फक्त एक मिनिटासाठी उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेऊन मला भेट दिली असती तर बरं झालं असतं. त्यावेळी अनिल देसाई बाजूला उभे होते. मी त्यांना म्हणालो की, ज्यांच्यामुळे यांची सत्ता आहे त्या आमदाराला जर अशी वागणूक मिळत असेल तर बाकीच्या लोकांचं काय? याचे परिणाम उद्धव ठाकरेंना भोगावे लागणार. 


अमित शाह, भाजपने केलेल्या दाव्याचं काय? 


गेल्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदाचा वाद निर्माण झाला होता. अमित शाहांनी आपल्याला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देतो असा शब्द दिला होता असा दावा उद्धव ठाकरे सातत्याने करत होते. त्यावर असा कोणताही शब्द दिला नव्हता असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. शेवटी मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये फूट पडली आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. 


उद्धव ठाकरेंना त्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा कोणताही शब्द दिला नव्हता असा दावा भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसोबत अमित शाहांनीही अलिकडेच केला होता. त्यावर आता संजय शिरसाटांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय. 


ही बातमी वाचा: