मुंबई:  महाराष्ट्रातून रोज एक उद्योग गुजरातला (Gujrat) जातोय, महानंदसारखा दुग्ध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  केला आहे.  महानंद (Mahananda)  गुजरातला नेला तर आम्ही गप्प बसणार नाही अशा थेट इशारा संजय राऊतांनी सरकारला दिला आहे. तर  केजरीवालांना मी ओळखतो, ते घाबरणाऱ्यांमधले नाहीत, अशी प्रतिक्रिया राऊतांनी केजरीवालांवरील ईडी कारवाईवर दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.   


संजय राऊत म्हणाले, महानंद डेअरी गुजरातच्या शिरपेचात आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला आहे. महाराष्ट्रात अनेक दुधाचे ब्रँड आहेत. ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन दूध डेअरी याचे फार मोठे जाळ आहे. त्यासाठी राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही.  कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटक सरकारची निवडणूक लढवली गेली मला वाटतं.  महानंदसंदर्भात जे वास्तव मी पाहतो आहे गुजरातला नेण्याचा हा प्रकार सुरू आहे. महानंद ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख पुसून टाकली जात आहे.  यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार घोटाळा दिसून येत नाही का? रोज एक एक व्यवसाय खेचून गुजरातमध्ये नेला जात आहे आणि हे तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.  हे कसले महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? दुग्ध व्यवसायाची सहकारी चळवळ प्रत्येक गोष्ट तुम्ही घेऊन जात आहात एक जात सगळे तुम्ही दिल्लीच्या ताटाखालचे मांजर आहे.  महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचे सरकार तयार झालेलं आहे. जर महानंद नेण्याचा प्रकार झाला तर शिवसेना गप्प बसणार नाही.


उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांची फोनवर चर्चा


इंडिया आघाडीच्य बैठकीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, काल उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांची फोनवरून चर्चा झाली. पुढल्या काळात  उद्धव ठाकरे आणि  इतर नेत्यांशी ते बोलत आहेत. काँग्रेसशिवाय जे इतर घटक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसवर फार भार न टाकता इंडिया आघाडीचे संघटन बनवण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे ही आमची भूमिका आहे.  त्यासाठी नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली


उद्धव ठाकरे  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधित करणार


आज दुपारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा आहे.  संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाखांपेक्षा जास्त कर्मचारी शिक्षक हे आझाद मैदानावर येत आहेत त्यांच्या मागण्या वर्षानुवर्षे आहेत.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला पण कोविडमुळे त्यात फार काही करता आलं नाही.  अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. आज आझाद मैदानावर विराट मोर्चा आहे आम्ही त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. दुपारी तीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधित करणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.  


 हिट अँड रन कायद्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, सरकार ज्या पद्धतीने कायदा बनवत आहे आणि जनतेची माफी मागत आहेत त्याचा हा परिणाम आहे.  हे सगळे विरोधी पक्ष संसदेत नसताना कायदे मान्य करून घेतले आहेत. चर्चा न घडवून घेता जेव्हा असे कायदे मान्य करून घेतले जातात तेव्हा जनतेचा असा उठाव होतो. 


हे ही वाचा :


संक्रातीला महायुतीच्या प्रचाराचा नारळ, लोकसभेला 45, विधानसभेला 225 प्लस टार्गेट, कोण किती जागा लढणार?