Sanjay Raut on Eknath Shinde: महाराष्ट्राच्या इतिहासात अजोड पराक्रम गाजवणाऱ्या आणि औरंगजेबासारख्या क्रूर कर्माला सलग २५ वर्षे जेरीस आणणाऱ्या स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी यांना चक्क 'जैन' संबोधल्याने नवा वाद पेटला आहे. जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात आचार्य नयन पद्मसागर यांनी हे विधान केले असून, यावेळी मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि इतर सत्ताधारी नेते उपस्थित असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत हल्लाबोल केला आहे. 

शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? 

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, काय सुरू आहे महाराष्ट्रात? शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या!औरंगजेबाशी  झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी? 

यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील!

ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या! ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, का? कशासाठी? उद्या हे सांगतील आमच्या मुंबईमहाराष्ट्रासाठी मेलेले 106 हुतात्मे सुद्धा जैन होते! यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील!

दरम्यान,  छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी 25 वर्षे औरंगजेबशी लढा दिला आणि त्याला जेरीस आणलं. ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली.  एकीकडे हा सर्व इतिहास असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी मात्र त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत. महाराणी ताराराणी या जैन समूदायाच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मोदी आल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला

दुसरीकडे, आचार्य नयन पद्मसागर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. ते म्हणाले की, "जो समाज धर्माला विसरतो त्याला भविष्य नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळालं पण गुलाम बहरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर निर्माण केले आणि हिंदुना मोठी भेट दिली. वयाच्या 75 व्या वर्षी सुद्धा मोदीजी काम करतात. तुम्ही ते नाही करु शकत नाही."

इतर महत्वाच्या बातम्या