Sanjay Raut : राऊतांच्या पुस्तकाला 'नरकातला स्वर्ग' हे नाव कुणी सूचवलं? जेलमध्ये असताना पुण्यातील 'तो' उद्योगपती नेमकं काय म्हणाला?
Sanjay Raut Book Narkatla Swarg : संजय राऊत यांना आर्थर रोड तुरुंगात असताना अनेक ओळखीची लोक भेटले. या सगळ्या अनुभवावर राऊतांनी 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिले.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. तुरुंगात असताना आलेल्या अनुभवावर, तिथल्या व्यवस्थेवर भाष्ट करणारे हे पुस्तक संजय राऊत यांनी लिहिलं आहे. पण या पुस्तकाला देण्यात आलेले'नरकातले स्वर्ग' हे नाव कसं पडलं असा प्रश्न अनेकांना पडला. त्यावर पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उजेड पडला. या पुस्तकाला नाव हे पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांनी सूचवले.
खासदार संजय राऊत यांना कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप ठेवत तुरुंगात पाठवण्यात आलं. ईडीने ही कारवाई केली. त्यानंतर संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगात गेले. त्यावेळी त्या ठिकाणी अनेक ओळखीचे चेहरे भेटले. त्यामध्ये पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले हेदेखील होते.
Avinash Bhosale : अविनाश भोसलेंचा सल्ला अन् लिखान सुरू
तुरुंगात असताना संजय राऊत यांना तिथल्या व्यवस्थेबद्दल अनेक बरेवाईट अनुभव आले. एकदा बोलता बोलता संजय राऊत अविनाश भोसलेंना म्हणाले की, तुरुंगातील या व्यवस्थेवर आणि अनुभवांवर एक पुस्तक लिहायला हवं. त्यावर अविनाश भोसले यांनी तसे पुस्तक लिहायचा सल्ला राऊतांना दिला.
या पुस्तकाचे नाव काय असायला हवं असा प्रश्न सहजपणे संजय राऊत यांनी अविनाश भोसले यांनी विचारला. त्यावर एका क्षणाचाही विलंब न करता अविनाश भोसले म्हणाले की 'नरकातला स्वर्ग'. यानंतरचया पुस्तकाचे लिखान सुरू झालं.
Sanjay Raut Book Narkatla Swarg : तुरुंगातल्या कुंदनने लिहायची व्यवस्था केली
ज्यावेळी संजय राऊत हे 8 ऑगस्ट रोजी आर्थर रोड तुरुंगात गेले त्यावेळी जेलरने सर्वात पहिला राऊतांचा पेन काढून घेतला. त्यामुळे संजय राऊतांना लिहण्याची अडचण झाली. तसेच तुरुंगात खाली बसून राऊतांना लिखान करणे अवघड झालं होतं. त्यावेळी तिथे असलेल्या कुंदन शिंदे नावाच्या व्यक्तीने संजय राऊतांची मदत केली. कुंदनने जेलरच्या स्टोअर रुममध्ये जाऊन काही पुठ्ठे आणले. ते एकावर एक ठेऊन त्याचा पॅड बनवला आणि ते राऊतांना दिले. त्यामुळे संजय राऊत पुढे लिखान करू शकले.
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग हे पुस्तक तुरुंगात असताना 80 टक्के पूर्ण केले. त्यानंतर 100 दिवसांनी राऊत बाहेर आले आणि उर्वरित 20 टक्के लिखान पूर्ण केले.
Sanjay Raut Book : काय म्हणाले संजय राऊत?
जेलमध्ये एक मिनिट एक वर्षासारखं वाटतं. जेलमध्ये गेल्यावर जगाशी संपर्क तुटतो. केवळ भिंती बघायच्या. अशात लिहिणं, वाचणं सुरु ठेवलं असं संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "मी शेवटचा माणूस ज्याच्यासोबत ईडीने पंगा घेतला. यापुढे ईडी नादाला लागणार नाही. या लढाईत प्रत्येकाने नैतिक पाठबळ दिलं. लाख तलवारे बडी आती है गरदन की तरफ, सर झुकाना नही आता तो झुकाए कैसे? आता झुकायचं नाही... लढत राहायचं."
























