मुंबई : महाराष्ट्रात आता टॅक्सी चालक, रिक्षाचालक, ओला आणि उबर चालकांनी प्रवाशांशी मराठीत बोलणे सक्तीचे करण्यात आलं आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकारने आता पावले उचलली आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक देखील घेतली आहे. तर दुसरीकडे या मराठी भाषेच्या सक्ती विरोधात रिक्षा चालकांनी 4 मे पासून संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मराठीत बोलण्याच्या सक्तीवरुन शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले संजय निरुपम?

शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी मराठी सक्तीवर फेरविचार करावा असं पत्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवलं आहे. शिवसेना नेते संजय निरुपम उद्या दहिसर परिसरात उत्तर भारतीय रिक्षा चालकांची संवाद देखील साधणार आहेत. त्यामुळं मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला शिवसेना शिंदे गटामध्येच विरोध होताना पाहायला मिळत आहे. 

महाराष्ट्र दिनापासून या निर्णयाच्या अमलबजावणी करण्याचा निर्धार

दरम्यान, सरकारने 2019 मध्ये हा निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक मराठीत संवाद साधत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.  परिवहन विभागाच्या वतीने 1 मे रोजी  ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.  मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Continues below advertisement

दरम्यान, अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.