सांगली : सांगलीत झालेल्या कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पैलवानांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचा हात देण्यात आला आहे. पाच पैलवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. सांगलीतील वांगीजवळ जानेवारी महिन्यात पैलवानांच्या गाडीला भीषण अपघात होऊन पाच जण मृत्युमुखी पडले होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याबाबतचं पत्र सहाय्यक संचालक सुभाष नागप यांनी सांगली आणि साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे. सर्व मयत पैलवान गरीब कुटुंबातील होते. या पैलवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी म्हणून खासदार संजय पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
जानेवारी महिन्यात सातारा जिल्ह्यातील औंध येथील कुस्त्या आटोपून कुंडलच्या दिशेने निघालेल्या पैलवानाच्या क्रूझर गाडीला वांगीजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात शुभम अंकुश घार्गे, अविनाश सर्जेराव गायकवाड, विजय शिवाजी शिंदे आणि गाडीचा चालक रणजित धनवडे या सांगली जिल्ह्यातील तर सौरभ अनिल माने, आकाश दादासो देसाई या सातारा जिल्ह्यातील पैलवानांचा मृत्यू झाला होता.
हे पैलवान सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील तालमीत सराव करत होते. या पैलवानांच्या कुटुंबाला क्रांतीअग्रणी कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. या पैलवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी खासदार संजय पाटील आणि जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड यांनी केली होती. त्यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच पैलवान आणि चालक यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर झाल्याचं पत्र सहाय्यक संचालक सुभाष नागप यांनी जिल्ह्याधिकारी सातारा आणि सांगली यांना दिलं आहे.