Sangli News : मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिस जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगली ते मुंबई या शहीद दौडला सुरुवात झाली आहे. सांगलीतील शहीद अशोक कामटे फौंडेशनकडून या शहीद दौडचे आयोजन करण्यात आलं आहे. शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातील एकमेव मॅरेथॉन आहे. 2021 पासून सांगली ते मुंबई अशी 470 किलोमीटरची दौड सुरू करण्यात आली. आज पहाटे शहीद पोलिस जवानांना अभिवादन करून या दौडला प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 नोव्हेंबर रोजी या दौडीचा समारोप आणि शहीदाना अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे.


या दौडमध्ये मशाल व तिरंगा हाती घेत 25 धावपटू सहभागी झाले आहेत. 26 नोव्हेंबर रोजी ही दौड मुंबईत पोचणार आहे. सांगली, इस्लामपूर, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई मार्गे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ही दौड 26 नोव्हेंबरला दाखल होईल. याठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दौडीचा समारोप आणि शहिदांना अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे.


दरम्यान, या धावपटूंना शुभेच्छा देण्यासाठी सांगलीतील शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशन आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्याकडून सांगलीत अडीच किलोमीटरची शहीद दौड पार पडली. महापौर दिग्विजय सुर्यवंशी, उपायुक्त राहुल रोकडे आणि समित कदम यांच्या उपस्थितीत विश्रामबाग येथील शहीद अशोक कामटे स्मृती चौकातून शहीद दौड सुरू झाली.  यामध्ये विविध शाळा, क्रीडा संस्था तसेच नामवंत धावपटू यांनी सहभाग घेतला. 


यावेळी अडीच किलोमीटर पर्यंत दौड काढीत मुंबईला पुढे जाणाऱ्या 22 धावपटूंना शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यात आले. हे 22 धावपटू 470 किलोमीटरचा प्रवास करीत 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत पोहचणार आहेत. हरमन चहाकडून सर्वांना चहा आणि नाष्टा याची सोयही करण्यात आली. कार्यक्रमावेळी अनेक साहसी खेळांचे प्रात्यक्षिके सुद्धा सादर करण्यात आली.


26/11 मुबंईवरील भ्याड हल्ला


26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबईवर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 जण ठार झाले होते. 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले होते व अजमल कसाबला तुकाराम ओंबळे यांनी जिवंत पकडले होते. पकडला गेलेला एकमेव दहशतवादी कसाब हा 26नोव्हेंबरला जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.


इतर महत्वाच्या बातम्या